पिंपरी गुरुपौर्णिमा

पिंपरी गुरुपौर्णिमा

Published on

गुरुपौर्णिमा विशेष
--
गुरुजींमुळे पखवाज वादनात विशारद

- अनुजा बोरुडे-शिंदे, पखवाज वादक

मा झे पखावजचे प्राथमिक शास्त्रीय शिक्षण पुण्यातील प्रसिद्ध पखावज वादक पं. वसंतराव घोरपडकर यांच्याकडे सुमारे दोन वर्षे झाले. गुरुजींचे वय त्यावेळी ८० वर्षे असावे. मी १३ वर्षांची होते. रविवारी सकाळी सात वाजता क्लासला जायचे. मी जायच्या आधीच गुरुजी तयार होऊन बसत. त्यांची शिकवण्याची पद्धत फार वेगळी होती. सुरुवातीला बोल समजावून सांगत. बोल समजल्यावर हाताने टाळीत म्हणता आला पाहिजे, नंतर पखावजावर तालाचा ठेका धरून म्हणता यायला हवा, मगच तो वाजवायला घ्यायचा. आजही त्या सादरीकरणाचा खूपच उपयोग होतो. क्लास झाल्यावर गुरुजी त्यांचे अनुभव सांगत. ते फारच शिस्तप्रिय व प्रेमळ होते. त्यांच्या निधनानंतर खास शास्रीय पखावजी शिक्षणासाठी भोपाळ (मध्यप्रदेश) येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे धृपदगायक पद्मश्री पं. अखिलेशजी गुंदेचा यांच्याकडे गुरुशिष्य परंपरेनुसार एप्रिल २०१४ पासून मार्च २०१९ अखेर राहिले. दररोज सकाळी लवकर उठून गुरुजी गुरुकुलात येण्यापूर्वी दोन-तीन तास रियाझ करायचो. सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत क्लास चालायचा. त्यात गुरुजी आमच्या हाताची ठेवण, वाजवण्याची पद्धत, बोलांचा निकास चांगला यावा, पढंत सुस्पष्ट असावी यावर अधिक भर द्यायचे. शिकवताना स्वत: आमच्या सोबत पखवाज वाजवत असल्याने खूप आनंद वाटायचा. काही चुका झाल्या तर तिथल्या तिथे लगेच दुरुस्त व्हायच्या. यामुळे वादनाची गोडी लागली. धृपद संगत कशी करावी, सोलो वादन कसे असावे, याविषयी गुरुजींनी खूप सराव करून घेतला. दुपारचे जेवण गुरुजी आमच्यासोबतच करायचे. त्यामुळे त्यांच्यासोबत एक आगळीच आपुलकी निर्माण झाली होती. दुपारी जेवणानंतर सेवा कार्य असायचे. बागेतील गवत काढणे, झाडांना पाणी घालणे, बांधकाम चालू असेल तिथे मदत करणे, परिसराची साफसफाई करणे अशी कामे दुपारी तीन ते पाच या वेळेत करायचो. सायंकाळी पाच ते सहा मोकळीक असे. परत सायंकाळी सहापासून रात्री नऊपर्यंत रियाझ चालत असे. असा पूर्ण दिवस पखावज एके पखावजचे शिक्षण असायचे. भोपालमध्ये बाहेरून आलेल्या ज्येष्ठ कलाकारांचे कार्यक्रम ऐकायला गुरुजी घेऊन जायचे. कधी कधी हे कलाकार गुरुकुलात येऊन आम्हाला मार्गदर्शन करायचेय त्यामुळे संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांचा सहवास लाभला. गुरुजी आपले शिष्य सर्वांगाने कसे कलाकार होतील, यासाठी सदैव प्रयत्नशील होते. म्हणूनच संगीत क्षेत्राची वाट चालता आली. गुरुजींमुळेच मी पखावज विषयात एमए केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला संगीत महोत्सव इंग्लंड, आंतरराष्ट्रीय युवा संगीत फेस्टिवल बेल्जियम व जर्मनीसह अमेरिकेतही पाठवले होते. तसेच, देशातील मानाचे तानसेन संगीत समारोह ग्वाल्हेर, कालिदास संगीत समारोह उज्जैन, धृपद मेळा वाराणसी, सप्तक संगीत महोत्सव अहमदाबाद, सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे अशा अनेक कार्यक्रमातून सादरीकरण करता आले. तसेच उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासमोर पखावज वादनाची दोन वेळा संधी मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com