रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे यकृत प्रत्यारोपण 
पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील डॉक्टरांची किमया

रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे यकृत प्रत्यारोपण पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील डॉक्टरांची किमया

पिंपरी, ता. ६ : रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे यशस्वीरीत्या यकृत प्रत्यारोपण करण्याची किमया पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील डॉक्टरांनी केली आहे. मुंबईनंतर महाराष्‍ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारची शस्त्रक्रिया पार पडली. पुण्यातील ३५ वर्षीय तरुणावर काही दिवसांपूर्वी ही शस्‍त्रक्रिया करण्यात आली. या रुग्णास हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असून, त्याची प्रकृती उत्तम असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
३५ वर्षीय शेतकरी तरुणाचे यकृत खराब झाल्याने तो दोन वेळा कोमामध्ये गेला होता. प्रत्यारोपणाची गरज ओळखून, त्याची पत्नी यकृत दान करण्यासाठी पुढे आली. मात्र; रुग्ण दोन वेळा कोमात गेल्याने प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची बनली. त्यामुळे रोबोटिक तंत्राचा वापर करून पत्नीच्या यकृताचे तरुणाच्या शरिरात यशस्वीपणे प्रत्यारोपण केले गेले व शस्त्रक्रियेनंतर अवघ्या आठवडाभरातच तरुण तंदुरुस्त होऊन घरी परतला. वैद्यकीय शास्त्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास काय होऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. या आधी महाराष्‍ट्रात मुंबईमध्ये प्रत्यारोपणासाठी रोबोटिक तंत्राचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी हे यश मिळविले आहे.
यकृत प्रत्यारोपणासारख्या शस्त्रक्रियेला आठ ते दहा तास लागतात. मात्र; रोबोटिक तंत्रज्ञानामुळे सहा तासात ही शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तीन दिवसांतच संबंधित रुग्ण व त्याची पत्नी यांची प्रकृती पूर्वपदावर आली, अशी माहिती डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या कार्यक्रम संचालिका व विभाग प्रमुख, बहू-अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुख डॉ. वृषाली पाटील यांनी दिली. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरु डॉ. भाग्यश्री पाटील व इतर डॉक्टर उपस्थित होते.
यकृताचे रोबोटिक तंत्राद्वारे प्रत्यारोपण हे आम्हाला मिळालेले खूप मोठे यश आहे. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाची व अवयवदात्याची शारीरिक स्थिती लवकर पूर्वपदावर येण्यास मदत होते व इतर रोग संक्रमणापासून बचाव होतो. तसेच शस्त्रक्रिये दरम्यान होणारी जखम तुलनेने अगदी लहान असते. त्यामुळे रुग्णाला होणारा त्रास व रक्तस्रावही कमी असतो, असेही त्यांनी सांगितले.
अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर किमान दोन आठवडे तरी रुग्णाला रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवावे लागते. मात्र; ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच पती- पत्नी दोघांनाही घरी सोडण्यात आले. दोघांचीही शारीरिक स्थिती तंदुरुस्त आहे, असेही डॉ. पाटील म्हणाल्या.

‘‘अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर अवयव दात्याला आपल्या शरीराच्या स्वास्थ्याबाबत चिंता असते. मात्र; रोबोटिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अवयवदात्याला कमीत कमी त्रास होतो. अवयव दाता अवघ्या काही दिवसांतच निरोगी जीवन जगू शकतो. यामुळे अवयवदानाला चालना मिळणार आहे.’’
-डॉ. वृषाली पाटील, विभाग प्रमुख, बहू-अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभाग, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, पिंपरी.
फोटोः ५३६९९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com