वीस दिवसांत अप्रगत मुलांना करा ‘प्रगत’
सेतू उपक्रम ः शिक्षकांनाही द्यावी लागणार चाचणी

वीस दिवसांत अप्रगत मुलांना करा ‘प्रगत’ सेतू उपक्रम ः शिक्षकांनाही द्यावी लागणार चाचणी

Published on

आशा साळवी ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ६ : कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षणामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे अनेक विद्यार्थी अप्रगत राहिल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर ‘सेतू’ उपक्रमांतर्गत अप्रगत मुलांसाठी २० दिवसांचा कालबद्ध उपक्रम हाती घेण्यात आला आहे. येत्‍या २० दिवसांत अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी आता शिक्षकांना चाचणी द्यावी लागणार आहे.
मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाची उजळणी व्हावी, तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शिकाव्या लागणाऱ्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी हा दुहेरी ‍उद्देश ठेवून हा ‘सेतू अभ्यासक्रम’ तयार करण्यात आला आहे. पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम हा २०२३-२४ साठी शालेय स्तरावर २७ जूनपासून अंमलबजावणी सुरु केला आहे. हा उपक्रम २० दिवस राबवायचा आहे. दिवसनिहाय दिलेल्या नियोजनाप्रमाणे कृतिपत्रिकांचा सराव करणार आहे. महापालिकेच्या मुलांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीआरटी) कडून हस्तपुस्तिका पुरविल्या आहेत. मात्र; खासगी अनुदानित शाळांनी संकेतस्थळावर पुस्तिका डाऊनलोड करायच्या आहेत. त्यावरून विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे. तसेच अप्रगत मुलांची यादी तयार करायची आहे. त्या मुलांना जादा तास, विविध शैक्षणिक ॲपचा वापर करून उजळणी करून घ्यायची आहे.

‘सेतू’ वर्ग का गरजेचा आहे?

कोरोना काळामध्ये शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांना घरात राहून ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागले. त्यातही त्यांना अनेक अडचणी आल्या. अशा मुलांना पुस्तकाच्या आधारे थोडेफार शिकता आले, असले तरी बऱ्याच गोष्टी त्यांना समजल्या नाहीत. अशा अप्रगत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याआधारे अप्रगत मुलांचे मूल्यमापन करून, त्यांची यादी तयार केली जाणार आहे. शिक्षकांनी केलेल्या यादीनुसार, मुलांना अतिरिक्त वेळेत न समजलेला भाग शिकवला जाणार आहे. अप्रगत मुलांसाठी २० दिवसांचा कालबद्ध उपक्रम महापालिका शाळेत सुरू झाला आहे. यामध्ये वाचन, लेखन आणि मूलभूत गणिताची तयारी करून घेण्यात येणार आहे. मूलभूत बाबींचा पाया पक्का होणे आवश्यक असल्याने सरावही घेण्यात येणार आहे. दररोज एक तास वाचन आणि लेखन सराव करून घेण्यात येणार आहे. गणित पेटी आणि भाषा पेटी साहित्याचा वापर करून, पालकांची मदत घेऊन मागे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यात येणार आहे. मुलांना रोज सरावासाठी स्वाध्यायही देण्यात येणार आहे. त्यामुळे दररोज अभ्यास करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल राहील. दर शनिवारी मुलांच्या प्रगतीचे मूल्यमापन शिक्षक करणार आहेत.

शिक्षण विभाग घेणार उत्तर चाचणी
पहिली ते पाचवीसाठी भाषा, गणित आणि इंग्रजी विषय तर; सहावी ते सातवीसाठी समावेशित विज्ञान या विषयांची तयारी करून घ्यायची आहे. शाळास्तरावर काम करणाऱ्या शिक्षकांनी अप्रगत मुलांची तयारी करण्यात येणार आहे. प्रत्येक मुलाच्या नोंदी घेऊन प्रगतीची नोंद केली जाणार आहे. २० दिवसांनंतर अप्रगत मुलांची किती प्रगती झाली, याचे शालास्तरावर मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यांची पायाभूत चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षण विभागाकडून अप्रगत मुलांची, पालकांची उत्तर चाचणी घेण्यात येणार आहे. मदत घेऊन शिक्षक अप्रगत मुलांना मुख्य प्रवाहात आणतील.


‘‘पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात सामावून घेण्यात आले आहे. अभ्यासक्रम अर्धवट राहिला. अशा मुलांसाठी हा उपक्रम उपकारक ठरणार आहे. प्रत्येक मुलाकडे व्यवस्थित लक्ष देऊन, अतिरिक्त वेळेत त्याला प्रगती करण्याची संधी देण्यात येणार आहे. २० दिवसात अप्रगत मुलांना प्रगत करण्याची तयारी शिक्षकांनी ठेवली पाहिजे.’’
- संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.