दिव्यांग विद्यार्थ्यांना २४ हजार अर्थसाहाय्य

दिव्यांग विद्यार्थ्यांना २४ हजार अर्थसाहाय्य

Published on

पिंपरी, ता. १० ः महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतून पहिली ते १८ वर्षांपर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना दरमहा दोन हजार रुपयांप्रमाणे वार्षिक २४ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. तसेच, दिव्यांगामुळे शाळेत जाऊ न शकणाऱ्या पाचवी ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना दरमहा तीन हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाणार आहे, या योजनांचा शहरातील नागरिकांनी लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन महापालिका उपआयुक्त अजय चारठाणकर यांनी केले आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांना बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसाहाय्य व प्रशिक्षण दिले जाणार आहे. वैद्यकीय शाखेच्या प्रथम वर्षासाठी एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीडीएस, बीयुएमएस, बी. आर्किटेक, बीपीटीएच, बी. फार्म, बीव्हीएससी आणि अभियांत्रिकी पदवी शिक्षणाच्या प्रथम वर्षासाठी एकदाच जास्तीत जास्त एक लाख रुपये अर्थसाहाय्य दिले जाईल. तसेच शहरातील दिव्यांगांना महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत (आयटीआय) एमकेसीएल अंतर्गत एमएस सीआयटी, डीटीपी, टॅली व केएलआयसी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

असे मिळेल अर्थसाहाय्य
- दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्था, वृद्धाश्रम, अनाथालयांना जास्तीत जास्त दोन लाख ९९ हजार रुपये
- दिव्यांगांना व्यवसायासाठी बॅंकेकडील मंजूर कर्जाच्या ५० टक्के अथवा जास्तीत जास्त एक लाख रुपये
- मतिमंदांना सांभाळणाऱ्या महापालिकेकडील नोंदणीकृत संस्था किंवा पालकांस दरमहा तीन हजार रुपये
- शहरातील कुष्ठपीडित व्यक्तींना दरमहा तीन हजार रुपये अर्थसाहाय्य
- दिव्यांगत्वाचे प्रमाण, प्रकार व गरजेनुसार अत्याधुनिक उपकरणे घेण्यासाठी एक लाख रुपये
- पंडित दीनदयाल उपाध्याय दिव्यांग कल्याणकारी योजनेतर्गत दरमहा अडीच हजार रुपये
- संत गाडगे महाराज दिव्यांग व अव्यंग जोडप्यांना विवाहासाठी एक लाख रुपये
- नवविवाहित दिव्यांग जोडप्यास दोन लाख रुपये एकदाच अर्थसाहाय्य

आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्या नियंत्रणाखाली दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्यांचा लाभ घेण्यासाठी शहरातील लाभार्थींनी अर्ज दाखल करावेत. महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावरील ‘समाज विकास विभाग योजना’ या पर्यायावर अर्ज उपलब्ध आहेत. ते ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पद्धतीने भरावेत.
- अजय चारठाणकर, उपआयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.