मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर यंत्रणा सज्ज

मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर यंत्रणा सज्ज

Published on

पिंपरी, ता. १८ ः भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे.
पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यास आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते, यामुळे कोणतीही जिवीत व वित्त हानी होऊ नये, यासाठी महापालिकेच्या सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर पाणी तुंबणार नाही, याची दक्षता महापालिका प्रशासनाने घ्यावी, रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, प्रभागनिहाय बीट निरिक्षक, अभियंते व संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पाहणी करून तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
शहरातील पूरसदृश परिस्थिती उद्भवणाऱ्या भागात प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. नदीकाठी असणाऱ्या शहरातील वस्त्यांमध्ये महानगरपालिकेचे पथक बारकाईने लक्ष ठेवून आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे. पाऊस जास्त प्रमाणात पडल्यास नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असते. यावेळी नदीकाठच्या नागरिकांनी आपल्या वस्तू व जनावरांची काळजी घ्यावी, नदीपात्रात उतरू नये, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी नागरिकांना दिल्या आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सोयीसाठी सर्व अग्निशमन केंद्रांच्या ठिकाणी पूर नियंत्रण कक्ष सुरू आहे. शिवाय महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष असून, सर्व कक्ष अखंड कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत.
- चंद्रकांत इंदलकर, सहआयुक्त, आपत्ती व्यवस्थापन विभाग

‘‘संभाव्य परिस्थिती लक्षात घेता अग्निशमनचे कर्मचारी शहरात फिरतीवर असतील. पावसामुळे झाडपडीचे तसेच इतर आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास शहरात अग्निशमन यंत्रणा सज्ज असून अग्निशमनची टीम बचावासाठी अखंड कार्यान्वित आहे.
- विजयकुमार थोरात, सहायक आयुक्त, अग्निशमन विभाग

हेल्पलाइन
- मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष ः ०२०-२८३३११११/६७३३११११

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.