तडीपार आरोपीला शस्त्रासह अटक

तडीपार आरोपीला शस्त्रासह अटक

Published on

वाकड : पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या आरोपीला गुंडा विरोधी पथकाने शस्त्रासह अटक केली. ही कारवाई सोमवारी (ता. १७) पहाटे पोलिसांनी केलेल्या कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान करण्यात आली. सौरभ विलास चौधरी (वय २१, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार रामभाऊ मोहिते यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवले. त्यात पोलिसांनी एका तरुणाला कोयता बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्या आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जानेवारी २०२३ मध्ये एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. त्याने शहरात येऊन हत्यार बाळगले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

चिखलीत भाड्याने नेलेल्या जेसीबीचा अपहार
चिखली : दरमहा ७० हजार रुपये भाडे देतो, असे सांगून जेसीबी नेला. त्यानंतर जेसीबीला लावलेला जीपीएस बंद करून थकलेले सव्वाचार लाख रुपये भाडे न देता जेसीबीचा अपहार केला. हा प्रकार १३ जानेवारी ते जुलै या कालावधीत जाधववाडी चिखली येथे घडला. योगेंद्र शिवाजी उदागे (वय ३२, रा. सुसरे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर किसन जाधव (वय ५१, रा. जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फिर्यादी यांचा जेसीबी दरमहा ७० हजार रुपये भाडे देतो, असे सांगून नेला. त्यानंतर फिर्यादी यांनी जेसीबीला लावलेली जीपीएस यंत्रणा बंद केली. १३ जानेवारी ते १७ जुलै या कालावधीतील ७० हजार रुपये दरमहाप्रमाणे चार लाख २० हजार रुपये भाडे न देता स्वतःचा फोन बंद करून आरोपी पळून गेला आहे.

दुचाकी अपहारप्रकरणी माजी कर्मचाऱ्यावर गुन्हा
पिंपरी : कंपनीत पूर्वी काम करत असलेल्या कामगाराने विश्वासाने नेलेली दुचाकी परत न देता तिचा अपहार केला. याप्रकरणी कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १४ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता मावळ तालुक्यातील सुदवडी येथे घडली. निखिल बापू चव्हाण (वय २२, रा. वडखेडी, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय तानाजी येडगे (वय २५, रा. निगडी) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काम करत असलेल्या कंपनीत आरोपी पूर्वी काम करत होता. त्याला बाहेरून सामान आणण्यासाठी दुचाकी हवी असल्याने त्याने फिर्यादींकडे त्यांची दुचाकी मागितली. फिर्यादी यांनी त्यांची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी दिली. आरोपीने दुचाकी नेऊन ती फिर्यादी यांना परत न देता तिचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.

गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक
पिंपरी : गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई सोमवारी (ता. १७) पहाटे कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान करण्यात आली. दीपक सिकंदर इंद्रेकर (वय २४, रा. भाटनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार प्रसाद जंगीलवाड यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील भाटनगर येथे एकजण गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दीपक इंद्रेकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी एक लाख दोन हजार ५०० रुपये किमतीचा चार किलो १०० ग्राम गांजा, सहा हजार ५०० रुपये रोख रक्कम असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पिंपळे गुरवमधून रिक्षा चोरी
पिंपळे गुरव : येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली रिक्षा अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना १५ जुलै रोजी रात्री दहा वाजता काशीदनगर येथे घडली. गोपाळ रामराव उखळे (वय ३९, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांच्या
विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची ३० हजार रुपये किमतीची रिक्षा (एमएच १२/एचसी २२८५) काशीदनगर, पिंपळे गुरव येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केली. रात्रीच्या वेळी एक महिला आणि एक पुरुष अशा दोन अनोळखी चोरट्यांनी रिक्षाचे लॉक तोडून रिक्षा चोरून नेली.

कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
पिंपरी : भरधाव वेगात जाणाऱ्या कारने एका दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (ता. १६) रात्री पावणे अकरा वाजता घरकुल कमानीजवळ, चिखली येथे घडली. माणिक प्रकाश बामणे (वय ४०) असे जखमी दुचाकीस्वराचे नाव आहे. याप्रकरणी बामणे यांच्या पत्नीने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार (एमएच ४३/बीजे ०६२८) चालक गणेश परमेश्वर दळवी (वय २१, रा. वडगाव बुद्रूक, ता. मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती दुचाकीवरून घरी येत असताना घरकुल वसाहतीच्या कमानीजवळ आरोपीने कार वेगात चालवून फिर्यादी यांच्या पतीच्या दुचाकीला धडक दिली. त्यात फिर्यादी यांचे पती गंभीर जखमी झाले आहेत. तसेच त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. चिखली पोलिस तपास करीत आहेत.

पिंपळे सौदागर येथे तरुणास मारहाण; एकास अटक
पिंपरी : कार्यालयासमोर थांबलेल्या तरुणाला शिवीगाळ करून सिमेंटच्या गट्टूने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (ता. १६) रात्री साडेआठ वाजता पिंपळे सौदागर येथे घडली. अनिकेत संतोष भालेराव (वय २०, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओम्कार दत्तात्रेय काटे (रा. पिंपळे सौदागर) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कार्यालयासमोर थांबले असताना आरोपी तिथे आला. ‘तुझे इथे काय काम आहे’ असे म्हणत फिर्यादीस शिवीगाळ केली. रस्त्याच्या बाजूला पडलेला सिमेंटचा गट्टू फिर्यादी यांना मारून त्यांना जखमी केले. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.