व्यायाम साहित्याची ‘खुलेआम’ चोरी

व्यायाम साहित्याची ‘खुलेआम’ चोरी
Published on

पिंपरी, ता. ११ ः नागरिकांनी व्यायाम करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून महापालिका क्रीडा विभागाच्या वतीने शहरातील १३८ ठिकाणी ‘ओपन जिम’ची सुविधा केली आहे. मात्र, त्याच्या पुरेशा देखभाल सुरक्षेअभावी त्यातील साहित्याची चोरी होत असल्याची बाब उघडकीस आली आहे. बहुतांश ठिकाणचे जीम व लहान मुलांच्या खेळण्याच्या साहित्याची मोडतोड झाली असून, दुरवस्था होत चालली आहे.

शहरात बहुतांश उद्यानांमध्ये ओपन जिम तयार केली आहे. मुलांच्या मनोरंजनासाठी खेळाचे साहित्य बसविण्यात आले आहे. परंतु, बहुतांश ठिकाणच्या जिमच्या साहित्यांची चोरी होत असल्याचे दिसत आहे. या गंभीर प्रकारांमुळे लाखो रुपयांचा चुराडा होत आहे. या बाबत वारंवार प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. महापालिका प्रशासनाकडून जिम व खेळाच्या साहित्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे.

उद्यानांमध्ये प्रशिक्षक नेमावा
महापालिका प्रशासनाने तीन पाळ्यांमध्ये उद्यानांमध्ये प्रशिक्षक नेमावा. प्रशिक्षक नेमल्यास नागरिकांना व्यायाम करण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले जाऊ शकेल, महापालिका उद्यानांवर एवढा खर्च करते, तर मग चांगले प्रशिक्षक नियुक्त केले जावेत. उद्यानात नागरिकांना सहज वापरता येतील, अशी व्यायामाची साधने बसविण्याची मागणी मनोज जाधव यांनी केली आहे.


साधनांवर लाखो रुपयांचा चुराडा
उद्यानांमध्ये नागरिकांना व्यायाम करता यावा, यासाठी ही दहा प्रकारची साधने बसवली जातात. उद्यानात सकाळ-संध्याकाळ येणाऱ्या नागरिकांना व्यायामाची साधने व त्यावर व्यायाम करतात. पण काही ठिकाणी ओपन जिम साहित्य चोरुन नेण्यात येत आहे. प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे ओपन जिम साहित्य चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. महापालिका प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून क्रीडा पर्यवेक्षकांनी अहवाल सादर करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक सचिन काळभोर यांनी केली आहे.

नुकताच प्रकार उघडकीस
निगडी-भक्ती शक्ती उड्डाणपूल ते त्रिवेणीनगर स्पाइन मार्गावरील यमुनानगर भागातील स्कीम क्रमांक ११ इमारत क्रमांक ४८ समोरील जॉगिंग ट्रॅक आहे. या जॉगिंग ट्रॅकवर २०२२ मध्ये महापालिकेच्या क्रीडा विभागाने ओपन जिम सुविधा उपलब्ध केली आहे. पण गेल्या एक ते दीड महिन्यापूर्वी ओपन जिममधील साहित्य चोरीस गेले. या संदर्भात आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे तक्रार केली आहे. याची प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन जिम सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. ज्यामुळे नागरिकांना व्यायाम करण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही.


‘‘महापालिकेचा ओपन जिम हा चांगला उपक्रम आहे. जिमला बंदिस्त करू शकत नाही. ज्या परिसरात जिम साहित्य चोरीला गेले आहे. त्याची पोलिसात तक्रार दाखल करण्यात येईल.’’
- मिनीनाथ दंडवते, सहायक आयुक्त, क्रीडा विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com