
वाहतूक नियमांबाबत जागरूकता अभियान
पिंपरी, ता. ३१ : महिंद्रा हेवी इंजिन्स आणि यश फाउंडेशन यांच्यावतीने रस्ता सुरक्षा प्रकल्प २०२२-२३ वाहतूक नियम आणि सुरक्षितता उपायांबद्दल जागरूकता उपक्रम राबविला. तसेच, खेड आणि पिंपरी-चिंचवड विभागातील १० पोलिस चौकींना रस्ता अपघात व आपत्कालीन परिस्थितीत लागणाऱ्या साधनांचे किट वाटप करण्यात आले.
अपघातानंतरच्या आपत्कालीन प्रतिसादासाठी नागरिकांना संवेदनशील आणि प्रशिक्षित करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून रस्ते अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये त्वरित मदत मिळेल. या उद्देशानेच रस्ता सुरक्षा कार्यक्रमाचा अंतर्गत रस्ते अपघातातील मृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने वाहतूक पोलिस व महिंद्रा कर्मचारींसाठी जीवन रक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
महिंद्रा हेवी इंजिन्सचे प्लांट प्रमुख संजय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनरक्षक प्रशिक्षण कार्यक्रम झाला. उद्घाटनप्रसंगी सहायक आयुक्त सतीश माने, ॲडमिन चंचल मेरतीया, सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्र अदलिंग, चंद्रशेखर चौरे, पोलिस कर्मचारी विकास औटे उपस्थित होते. जीवनरक्षक प्रशिक्षण प्रात्यक्षिकाद्वारे डॉ. सागर सोनावणे यांनी घेतले. त्याचप्रमाणे १०८ रुग्णवाहिकेचे कार्य, भूमिकेबद्दल माहिती दिली. रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रशिक्षणार्थींना जीवनरक्षक किटचे वाटप केले.