गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल हिसकावला
पिंपरी : पादचाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल हिसकावल्याची घटना भोसरी एमआयडीसी येथे घडली. मोहमंद साहिद मोहमंद रहीमुद्दीन मन्सुरी (रा. भोसरी, मूळ- मध्यप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे भोसरी एमआयडीसीतील शर्मा इंडस्ट्रीज कंपनीसमोरील रस्त्याने पायी कामावर जात होते. दरम्यान, दुचाकीवरून तिघेजण त्यांच्याजवळ आले. पाठीमागे बसलेल्या दोघांनी फिर्यादीला कोयत्याचा धाक दाखवत सात हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला.
-----------------
फोटो व्हायरलची धमकी देत महिलेवर अत्याचार
फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पिंपरी, शिर्डी व नांदेड येथे घडला.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार बसवंत माधवराव गायकवाड (रा. बिबोली तालुक्यातील खेडे, जि . नांदेड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादीशी इंस्टाग्रामद्‍वारे ओळख वाढवली. फिर्यादीने आरोपीचा नंबर ब्लॉक केला असता इतर वेगवेगळ्या नंबरवरून फिर्यादीला वारंवार मेसेज करून त्यांचा पाठलाग केला. फिर्यादीला भेटण्यासाठी आग्रह करून त्यांच्या भावाला मारून टाकण्याची धमकी दिली. फिर्यादीला शिर्डी येथे भेटायला बोलावून तेथे एका रूमवर त्यांचे फोटो काढले. जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर फिर्यादी या त्यांच्या भावासह नांदेड येथे राहण्यास गेल्या असता आरोपीने त्यांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार केला.
------------------------
गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक
बेकायदारित्या गांजा बाळगल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली. ही कारवाई वाकड येथे करण्यात आली. संकेत अशोक थोरात (वय १९, रा. येवले चाळ, वाकड) व एक महिला अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडे गांजा असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी म्हातोबानगर झोपडपट्टी येथून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दोन किलो ३७५ ग्रॅम वजनाचा बारा हजार रुपये किमतीचा गांजा सापडला.
----------------------
महिलेची सोनसाखळी हिसकावली
मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्याने हिसकावली. ही घटना चिंचवड येथे घडली. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली असून त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या कृष्णानगर येथील मंदिरात गेल्या असता गर्दीचा फायदा घेत फिर्यादीची नजर चुकवून पन्नास हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली.
---------------------------
पॅनकार्ड अपडेटच्या बहाण्याने दोन लाखांची फसवणूक
पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने एकाची ऑनलाइनद्वारे दोन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार चिंचवड येथे घडला. रितेश तिलकराम बोहरे (रा. श्रीधरनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या मोबाईलवर आरोपीने लिंक पाठवून फिर्यादीचे पॅनकार्ड अपडेट करण्यास सांगितले. फिर्यादीने ते अपडेट केले असता ऑनलाइन माध्यमाद्वारे फिर्यादीच्या बँक खात्यातून दोन लाख रुपये परस्पर काढून घेत त्यांची फसवणूक केली.
----------------
घरफोडीत सव्वा लाखांचे दागिने लंपास
दरवाजाचे कुलूप तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले. संजीत कुमार वशिष्ठप्रसाद सिंह (रा. साई श्रद्धा गार्डन, फेज एक, विजयनगर, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांच्या गावी गेलेले असताना बंद दरवाजाचे कुलूप तोडून चोरटे घरात शिरले. बेडमरुममधील कपाटातील एक लाख २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.
--------------------