
गुन्हे वृत्त
वय वाढवून बोहल्यावर
चढलेल्या नवरदेवावर गुन्हा
पिंपरी : कागदपत्रांवर खाडाखोड करीत वय वाढवून लग्न करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३ मे २०२३ रोजी आळंदीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी तरुणीच्या वडिलांनी आळंदी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार नवरदेवासह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गणेशने शाळेचा दाखला व आधार कार्डच्या झेरॉक्सवर जन्म तारखेत खाडाखोड करून स्वतःचे वय जास्त असल्याचे भासविले. त्यावरून हिंदू पद्धतीने आळंदी येथे तरुणीशी विवाह केला. मात्र, नवरदेवाचे वय कमी असल्याचे लक्षात येताच तरुणीच्या वडिलांनी आळंदी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आळंदी पोलिस याचा पुढील तपास करीत आहेत.
चऱ्होलीत महिलेची सव्वातीन लाखांची फसवणूक
दिघी : बेकरी सुरू करण्याच्या बहाण्याने एकाने महिलेची सव्वातीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना चऱ्होली येथे २६ जून २०२२ ते ३० जानेवारी २०२३ या कालावधीत घडली. या प्रकरणी महिलेने दिघी पोलिस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जिया उल अन्सारी (वय ३५, रा. पिंपरी) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने फिर्यादी यांना विश्वासात घेतले. ‘केक अ लॉक’ या नावाने बेकरी सुरू करण्याचे आमिष दाखवले. बेकरी सुरू करण्यासाठी मशिन खरेदी करण्याबरोबरच इतर बाबींकरिता आरोपीने फिर्यादी यांच्याकडून रोख व चेकद्वारे तीन लाख २५ हजार रुपये घेतले. त्यानंतर बेकरीचा करारनामा करतो, असे सांगितले. मात्र, अद्याप कोणताही करारनामा न करता आरोपीने परस्पर पैशांचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दिघी पोलिस तपास करीत आहेत.
भोसरीतील कंपनीची पावणे दोन कोटींची फसवणूक
भोसरी : कोऱ्या धनादेशावर बनावट सह्या, कंपनीचा बनावट शिक्का मारुन पावणे दोन कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार दोन नोव्हेंबर २०२२ ते ४ मे २०२३ या कालावधीत एमआयडीसी भोसरी येथील एका कंपनीत घडला. याप्रकरणी एमयाडीसी भोसरी पोलिस ठाण्यात अंकित प्रदिप जैन (वय ३८, रा. मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नीलकंठ मच्छिंद्र पाटोले (रा. भोसरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे कंपनीत कायदा सल्लागार म्हणून काम करतात. दरम्यान, आरोपीने कंपनीच्या धनादेशावर सही न घेता कंपनीचे बनावट लेझर बनवले. बनावट शिक्का तयार केला. खोट्या सह्या करीत कंपनीच्या खात्यातून वेळोवेळी एक कोटी ८४ लाख ४४ हजार ५०० रुपये काढून घेतले. एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.
मुलीच्या विनयभंग; देहूरोडमध्ये तरुणाला अटक
देहूरोड : रात्रीच्या वेळी घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग कऱणाऱ्या तरुणाला तरुणाला देहूरोड पोलिसांनी अटक केली. हा प्रकार शुक्रवारी (ता. २६) रात्री देहूरोड येथे घडला आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्ताफ सय्यद (वय २१, रा. देहूरोड) याला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी घरात झोपले असताना आरोपीने घरात शिरून फिर्यादी यांच्या १७ वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन केले. फिर्यादी यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.