गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त
--------
टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी (ता. २७) वासुली एमआयडीसी येथे दुपारी हा अपघात झाला.
भुषण नवनाथ गायकवाड (वय २०, रा. शिंदेगाव, खेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुभाष पवार यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, टेम्पोवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण हे दुचाकीवरून वासुली, एमआयडीसी येथून जात होते. त्यावेळी आरोपी चालवत असलेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये भूषण गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर आरोपी तेथे न थांबता पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

भरधाव डंपरच्या धडकेत सायकलस्वार मुलाचा मृत्यू
पिंपरी : भरधाव डंपरने धडक दिल्याने सोळा वर्षीय सायकलस्वार मुलाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. ३०) सकाळी दहाच्या सुमारास जाधववाडी, चिखली येथे घडली.
धीरज प्रदीप निकम (वय १६, रा. पंचनगर कॉलनी, जाधववाडी, चिखली) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी डंपर चालक ज्ञानदेव गोपाळ पवार (वय ५५) याला ताब्यात घेतले आहे.
पोलीस निरीक्षक राजेंद्र बर्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज निकम हा दहावीत शिक्षण घेत होता. दरम्यान, मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास धीरज सायकलवरून जात होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या डंपरने त्याच्या सायकलला धडक दिली. यामध्ये धीरजचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डंपर चालकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

पंचांच्या निर्णयाने दोन गटात राडा
- परस्पर विरोधी गुन्हे दाखल
पिंपरी : क्रिकेट सामना सुरू असताना पंचांनी ''नो बॉल'' दिला. त्यावेळी खेळाडूंनी पंचांनी जाब विचारला असता पंचांनी खेळाडूंना मारहाण केली. त्यानंतर खेळाडूंनी पंचांची बाजू घेणाऱ्या गटातील तरुणांना मारहाण केली. हा प्रकार रविवारी (ता. २८) दिघी येथे घडला.
यासीन आशिष चिट्टपरम (वय २४, रा. दिघी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बापू परांडे (वय ३२, रा. परांडे होम्स, दिघी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्यासह अन्य काही मुले शनिवारी रात्री दिघी येथील मैदानात क्रिकेट खेळत होते. बापू परांडे यांनी एक ''नो बॉल'' दिला. याबाबत फिर्यादी आणि इतर खेळाडूंनी जाब विचारला. त्यावरून परांडे याने फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी, हाताने मारून शिवीगाळ केली. तू दिघीमध्ये राहायचे नाही, अशी फिर्यादी यांना धमकी दिली. तसेच, काही वेळाने फिर्यादी यांना दगडाने मारहाण केली. कारमधून हॉकीस्टिक काढून फिर्यादीच्या पाठीवर, खांद्यावर, कमरेवर, हातावर मारून जखमी केले. ''तू यापुढे दिघीमध्ये दिसला तर तू मरणार, अशी आरोपीने धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याच्या परस्पर विरोधात गुलाब बबन परांडे (वय ३५, रा. दिघी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पप्या चिट्टपरम (वय २२), रोहित उदयराज सिंग (वय २१), यासीन चिट्टपरम (वय २२, सर्व रा. दिघी) आणि दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री फिर्यादी आणि इतर मुले क्रिकेट खेळत असताना वाद झाला होता. याचा राग मनात आरोपी कोयते घेऊन मैदानात आले. ''बापूला बोलवा, त्याचा मर्डर करणार आहे. त्याला मारून टाकणार आहे, अशी आरोपींनी धमकी दिली. त्यातील एकाने दोघांची गचांडी पकडून, ''तुम्ही बापूला काल मदत केली'' असे म्हणून स्टंपने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी मध्यस्थी करण्यासाठी गेले असता त्यांच्या डोक्यात स्टंप लागून दुखापत झाली. त्यानंतर आरोपी कोयते हवेत फिरवत दहशत पसरवून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास दिघी पोलीस करीत आहेत.


विशाखापट्टणम येथून आणलेला १५ किलो गांजा जप्त
पिंपरी : विशाखापट्टणम येथून विक्रीसाठी आणलेला १५ किलो गांजा पोलिसांनी सापळा लावून जप्त केला. रविवारी (ता. २५) अमंली पदार्थ विरोधी पथकाने खेड तालुक्यातील सुपे गाव येथे ही कारवाई केली.
विकास रोहीदास बदाले (वय २७, तळेगाव एमाआयडीसी), शिवाजी वसंत भोसले (वय ३६, करंजविहीरे), लक्ष्मण निवृत्ती कुंभार (वय ३७, अंबोली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याशिवाय विशाखापट्टणम येथील एक इसम (पुर्ण पत्ता व नाव माहिती नाही) याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई कपिलेश कृष्णा इगवे यांना माहिती मिळाली की, सुपे गावातील मुक्ताई मंदिरा समोर तीनजण गांजा विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. आरोपी विकास आणि शिवाजी यांच्या ताब्यात दोन लाख ५२ हजार १५० रुपयांचा १० किलो ८६ ग्रॅम वजनाचा गांजा तर, आरोपी लक्ष्मण याच्याकडून एक लाख ३४ हजार रुपयांचा पाच किलो ३६४ ग्रॅम वजनाचा गांजा असा एकूण तीन लाख ८६ हजार २५० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी लक्ष्मण याने त्याच्याजवळील गांजा विकास आणि शिवाजी यांच्याकडून विकत घेतल्याचे समोर आले. तर, विकास आणि शिवाजी यांनी विशाखापट्टणम येथील चौथ्या साथीदाराक़डून गांजा घेतल्याचे कबुल केले. या कारवाईत पोलिसांनी तिनही आरोपींकडून एकूण ४ लाख १ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

साखरपुडा झालेल्या तरुणाकडून लैंगिक छळ
पिंपरी : साखरपुडा झालेल्या तरुणाने तरुणीचा लैंगिक छळ केला. तसेच, तिच्या चारित्र्यावर संशय़ घेत लग्नाला नकार दिला. हा प्रकार जून २०२२ ते १३ मे २०२३ या कालावधीत दिघी येथे घडला.
याप्रकरणी पीडित तरुणीने दिघी पोलीस ठाण्यात सोमवारी (ता. २९) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विकास राजेंद्र पवार (वय २८) बाळू राजेंद्र पवार यांच्यासह तीन महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचा आरोपी विकास याच्याशी ५ मे २०२० रोजी साखऱपुडा झाला आहे. दरम्यान, आरोपीने तरुणीला जबरदस्ती लॉजवर नेले. लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर फिर्यादी यांनी लग्नाची मागणी केली. त्यावेळी आरोपीने तरुणीच्या चारित्र्यावर संशय घेत लग्नाला नकार दिला. त्यानंतर २२ एप्रिल रोजी आरोपी महिलेने तरुणीच्या हातावर खलबत्ता मारून हात फ्रॅक्चर केला. तसेच, इतर महिला आणि आरोपी बाळू पवार यांनी देखील तरुणीला शिवीगाळ करीत मारहाण केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

कारने चिरडल्याने श्वानाचा मृत्यू ; परस्परविरोधी गुन्हा
पिंपरी : कारने चिरडल्याने सोसायटीतील श्वानाचा मृत्यू झाला. यातून झालेल्या भांडणातून वाकड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार कस्पटेवस्ती येथील प्रिस्टीन ग्रँनडिअर सोसायटी येथे रविवारी (ता. २८) घडला.
अंकित सुरेंद्र गुप्ता (वय ३३, रा.कस्पटे वस्ती) यांनी वाकड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार एका महिलेवर प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीने शेरू नावाचे श्वान पाळले होते. शेरू सोसायटीच्या गेटच्या जवळ रस्त्यावर झोपला होता. त्यावेळी सोसायटीत राहणारी आरोपी महिला चालवत असलेल्या कारने शेरूला चिरडले. सोसायटीच्या वॉचमनने महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी महिला तशीच कार घेऊन पुढे निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याच्या परस्पर विरोधात संबंधीत महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अंकित गुप्ता व दोन महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेच्या फिर्यादीनुसार, शेरू फिर्यादी यांच्या कारखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पहात असताना आरोपींनी ''''तुला गाडी खाली कुत्रा आला तरी कसे कळले नाही, दारु पिऊन गाडी चालवत होतीस का, असे म्हणत फिर्यादी यांना ढकलून दिले. तसेच, पोलीस ठाण्यात गाडी घेण्यास सांगत शिवीगाळ केली. यावरून वाकड पोलीस ठाण्यात परस्पत विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.

किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने वार
पिंपरी : आईला शिवीगाळ करणाऱ्यास जाब विचारल्याच्या रागातून तरुणावर चाकूहल्ला केला. ही घटना रविवारी (ता. २८) रात्री साडेदहाच्या सुमारास तळेगाव दाभाडे मधील रणजितसिंह दाभाडे नगर येथे घडली.
अंकुश रमेश कांबळे (रा. रणजितसिंह दाभाडे नगर, तळेगाव दाभाडे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुरज नागनाथ तुपसुंदर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री फिर्यादी कांबळे त्यांच्या मित्रासोबत घरी जेवण करीत होते. त्यावेळी आरोपी सुरज याने फिर्यादी यांच्या आईला शिवीगाळ केली. याचा फिर्यादी यांनी जाब विचारला. त्यावरून सुरज याने फिर्यादी यांच्या गळ्यावर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न, धमकी आणि हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com