गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

सांगवीत महिलेची सात लाखांची फसवणूक
सांगवी : कंपनीत गुंतवणुक केल्यास चार टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून महिलेची तब्बल सात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार सांगवीत घडला. या प्रकरणी महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नितीन येवले (वय ४०) अमित बांगर (वय ४०, रा. पिंपळे सौदागर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांना आरोपींनी नितीन याच्या युनायटेड कलर कंपनी या पेंटिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास प्रतिमहिना चार टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. फिर्यादी यांनी वेळोवेळी सात लाख रुपये गुंतवले. याचा कोणताही परतावा आरोपींनी फिर्यादी यांना दिला नाही. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.

अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्यांवर गुन्हा
पिंपरी : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत तिला त्रास देणाऱ्या दोन रोड रोमियोवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (ता. २८) मेदनकरवाडी, चाकण येथे घडला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांची पंधरा वर्षाची मुलगी दहावीच्या वर्गात शिकत आहे. दरम्यान, आरोपींनी तिचा पाठलाग केला. दुचाकीचे हॉर्न वाजवत, कॉलर उडवून हाताने इशारे केले. बुलटचे फटाके वाजवून मुलीच्या अंगावर गाडी घातल्यासारखे करून तिला त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चाकण पोलिस तपास करीत आहेत.

धानोरे गावात साडेचार लाखांची घरफोडी
चऱ्होली : दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील साडेचार लाखांचा ऐवज चोरून नेला. सोमवारी (ता. २९) रात्री दोन ते अडीच दरम्यान धानोरेगाव येथे ही घटना घडली. या प्रकरणी स्वप्नील हनुमंत गावडे (वय ३२, रा. धानोरे)यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील चार लाख ५५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. आळंदी पोलिस तपास करीत आहेत.

चिंचवडमध्ये जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न
चिंचवड : सुरक्षा रक्षकाला मारहाण करीत दोघांनी मिळून जमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार चिंचवड येथे मंगळवारी (ता. ३०) सकाळी घडला. या प्रकरणी माऊली ऊर्फ किसन रामा भोसले (वय ३०, रा.चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुशील अगरवाल आणि त्याचा मुलगा व एक इसम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी राहत असलेल्या परिसरात आरोपी आले. त्यांनी फिर्यादी यांना गेट उघड ही आमची जागा असून आम्हाला काम करायचे आहे, असे म्हणत धमकी दिली. गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत फिर्यादीच्या कानाखाली दिली. घरातील सामानाची नासधूस करीत अडगळीच्या खोलीतील सामान बाहेर फेकून दिले. यावरून चिंचवड पोलिस तपास करीत आहेत.

देशी दारुची वाहतूक; एकास अटक
आकुर्डी : दुचाकीवरून देशी दारुची वाहतूक करणाऱ्या एकास पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (ता. ३०) आकुर्डी येथे ही कारवाई केली. करुणाकर हेरीअप्पा शेट्टी (वय ४५, रा. चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई मितेश मोहन यादव यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी दुचाकीवरून दारूची वाहतूक करीत होता. या बाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून अकरा हजार ७८५ रुपयांची दारू आणि ५० हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण ६१ हजार ७८५ रुपयांचा ऐवज जप्त केला. निगडी पोलिस तपास करीत आहेत.

शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग
चाकण : शेतात काम करणाऱ्या महिलेशी गैरवर्तन करीत तिचा विनयभंग करण्यात आला. हा प्रकार मंगळवारी (ता. ३०) दौडकरवस्ती, चाकण येथे घडला. या प्रकरणी पीडितेने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोपान ज्ञानेश्वर गुजर (३२, रा. पिंपळगाव, खेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी दुसऱ्याच्या शेतात बाजरी काढण्याचे काम करीत
होत्या. त्यावेळी आरोपीने गैरवर्तन केले. मात्र, फिर्यादी यांनी हातातील विळा दाखवताच आरोपी घाबरून तिथून निघून गेला. दरम्यान, आरोपीने कोणाला सांगितले तर बघून घेईन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चाकण त.पोलिस तपास करीत आहेत.