विद्यार्थी केंद्रबिंदू मानून काम करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थी केंद्रबिंदू मानून काम करा
विद्यार्थी केंद्रबिंदू मानून काम करा

विद्यार्थी केंद्रबिंदू मानून काम करा

sakal_logo
By

महापालिका प्रशासक सिंह यांची ‘संवाद’ कार्यशाळेत शिक्षकांना सूचना
पिंपरी, ता. ९ ः ‘‘महापालिका शाळांमध्ये शिकल्याचा विद्यार्थ्यांना अभिमान वाटला पाहिजे, असे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यांना द्यायला हवे. त्यासाठी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे’’ अशा शब्दांत प्रशासक शेखर सिंह यांनी शिक्षकांची कानउघडणी केली. शिक्षकांच्या कामामुळेच महापालिका शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या निश्चितपणे रांगा लागतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित संवाद कार्यशाळेत ते बोलत होते. दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या १३ विद्यार्थ्यांचा प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. शैक्षणिक दिनदर्शिका २०२३-२४, बालवाडी अभ्यासक्रम हस्तपुस्तिका, बालवाडी उपक्रम दिनदर्शिका २०२३-२४ चे प्रकाशन झाले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक प्रशासन अधिकारी रजिया खान, रोहिणी शिंदे आदी उपस्थित होते. शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी प्रास्ताविक केले. गणेश लिंगडे यांनी सूत्रसंचालन केले. रामेश्वर पवार यांनी आभार मानले.

आयुक्तांच्या सूचना
- यावर्षी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शैक्षणिक साहित्याचे पैसे संबंधित विद्यार्थी पालकांच्या खात्यावर थेट जमा केले जाणार आहेत, याकडे लक्ष द्यावे
- स्कॉलरशिप परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांसाठी भारत दर्शन सहलीचे आयोजित केली जाणार आहे, अशीच सहल ‘उत्कृष्ट शिक्षक’ संकल्पना राबवून त्यांच्यासाठीही आयोजित केली जाईल
- शिक्षक व प्रशासनात समन्वय राखणे व समस्यांच्या निराकरणासाठी सारथी हेल्पलाइनवर तक्रारवजा सूचना शिक्षकांनी केल्यास त्यांचा तातडीने निपटारा करण्यासाठी प्रयत्न केले जातील
- शिक्षकांचा आत्मविश्वास वाढावा, महापालिका शाळांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे, शाळांची गुणवत्ता वाढावी यासाठी संवाद कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरतील
- बालवयात मुलांमधील शारीरिक दोषांवर वेळेत उपचार करण्यासाठी मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील बालवाडीकडे लक्ष देऊन समस्या सोडविण्यासाठी समन्वय ठेवावा
- विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे, त्यांना बदलत्या जगाची ओळख करून देणे, त्यांच्या स्वप्नांना प्रेरणा देण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे
- आधुनिक तंत्रज्ञान वापरून विद्यार्थ्यांना आधुनिक जगाची ओळख करून देणे, अभ्यासक्रमासोबतच त्यांचे संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकासावरही शिक्षकांनी भर दिला पाहिजे

महापालिका शाळा, रुग्णालये, उद्यानांसारख्या ठिकाणी दर्जेदार सुविधा दिल्यास नागरिकांचा महापालिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होत असतो. प्रशासनाकडून महापालिका शाळांना विविध सेवा सुविधा पुरवल्या जातात. मात्र, त्यांचा गुणवत्ता स्तर उंचावण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियातर्फे शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे.
- शेखर सिंह, प्रशासक तथा आयुक्त, महापालिका

महापालिका शाळेची गुणवत्ता नेहमीच उत्कृष्ट दर्जाची राहिली असून भविष्यातही शालेय सुविधा वेळेत पुरविण्याकडे प्रशासन प्रयत्नशील राहील. विद्यार्थ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणीसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथक नियुक्त केले असून शिक्षकांचे प्रश्न तत्परतेने सोडविण्यासाठी प्रशासन काम करीत असून शिक्षकांनी शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
- प्रदीप जांभळे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका