आषाढी वारी विशेषांक - अवधूत गांधी

आषाढी वारी विशेषांक - अवधूत गांधी

Published on

आषाढी वारी विशेषांक - अवधूत गांधी

वारीतील भजन परंपरा

इंट्रो - शास्त्रीय संगीताची गायकी ही स्वरप्रधान आहे. त्यात, शब्दांना फारसे महत्व नसते. स्वर अजिबात हालता कामा नये. ठरलेल्या रागाप्रमाणेच त्याची मांडणी झाली पाहिजे. सुगम संगीत ही शब्द प्रधान गायकी आहे. स्वराला महत्व आहेच. परंतु, शब्दांनाही महत्व आहे. पण, वारकरी भजन परंपरेत स्वर असेल तर ठिक आहे. शब्दांना महत्व आहेच. परंतु, त्यापेक्षा भाव जास्त महत्वाचा आहे. ही भावप्रधान गायकी आहे.
----------------------------------------------------
भजन हा वारकरी संप्रदायाचा आत्मा आहे, असे आपल्याला म्हणता येईल. कारण, ‘तुका म्हणे येथे भजन प्रमाण’ असे सांगितले गेले आहे. हे वचन आहे की, नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये न च । मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ।। जिथे माझे फक्त गायन करतात तिथे मी तिष्ठत उभा आहे. सगळ्यांत संगीत हे भगवंताला प्रिय आहे आणि भजन हे तर त्याला खूप जास्त प्रिय आहे. वारीत पहिल्यापासून भजन आणि नामसंकीर्तन या दोन गोष्टी खूप महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत. भजन करताना दोन गोष्टी होतात. एक म्हणजे भावसमाधी लागते. बाकी सर्व गोष्टींचा विसर पडतो.

देहभानाचा विसर
वारीचा आनंद तुकाराम महाराज यांनी सांगितला आहे की, आनंद तेथिचा मुकियासी वाचा । बहिर ऐकती कानी रे । आंधळयासी डोळे पांगळांसी पाय । तुका म्हणे वृध्द होती तारुण्ये रे ॥ असा तो अभंग आहे. भजन करत नाचत गात सगळी भक्तमंडळी जात असतात. त्याच्यामध्ये, अंधांना दृष्टी मिळते, पांगळ्यांना पाय फुटतात, अशा अर्थाने तुकाराम महाराज यांनी वर सांगितले आहे. सर्व देहभान विसरुन भक्त तल्लीन होत असतात.

वारीतील पुरातन भजन परंपरा
प्रत्येक फडावरील भजन परंपरा वेगवेगळी आहे. त्याप्रमाणे, त्यांची भजनी मालिका ठरलेली आहे. त्या त्या परंपरेनुसार संतांचे अभंग गात जात असतात. भजनाचेही त्यांचे नियम आहेत. कोणत्या दिवशी कोणते अभंग म्हणायचे. त्यांच्या चालीसुद्धा सांप्रदायिक शेकडो वर्षे जुन्या आहेत. त्या गायल्या जातात. प्रत्येक संतांचे वारानुसार अभंग ठरलेले असतात. मुक्कामाच्या ठिकाणीही अभंग ठरलेले असतात. उदाहरणच द्यायचे झाल्यास, जेजुरीच्या मुक्कामात ‘अहं वाघा, सोहं वाघा प्रेमनगारा वारी । असे खंडेरायाशी संबंधित अभंग तेथे गायले जातात.

मृदंग, टाळ आणि वीणेला स्थान
दिंड्यांत ‘रामकृष्ण हरी’ या नामस्मरणाने भजनाला सुरुवात होते. काही ठिकाणी विणेकरी असतात. काही ठिकाणी गायक मंडळी सुरुवात करतात. मुख्य मान विणेकऱ्याचाच असतो. वीणा, मृदंग आणि टाळ या शिवाय इतर कुठले वाद्य वारकरी भजन परंपरेत नाही. हल्ली बऱ्याच ठिकाणी हार्मोनियम घेतले जाते. परंतु, जुन्या परंपरेत मृदंग, टाळ आणि वीणा यावरच भजन चालते. वारकरी परंपरेच्या चाली गाताना काही अपवाद वगळता अभंगाचे दुसरे चरण हे ध्रुपद असते. हे वारकरी भजन परंपरेचे वैशिष्ट्य आहे. दुसरे म्हणजे, शेवटच्या चरणाची चाल बदलली जाते. हे अन्य संगीतात दिसून येत नाही.

भजनात भावाला महत्व
भजनात काय आनंद आहे ? याबद्दल माझे गुरु डॉ.रामचंद्र देखणे हे सांगायचे. ‘जो आनंद योग्याला समाधीचा, तो आनंद सर्वसामान्यजनांना मिळावा, यासाठी भजनाची निर्मिती झाली.’ वारकरी भजन परंपरेत ज्याला गाता येतो तो गातो आणि ज्याला गाता येत नाही, तोही गातो. इथे भाव महत्वाचा आहे. इथे स्वराला महत्व नाही. पांडुरंगाला आळवणे असेल किंवा इतर कुठल्याही देवाला त्याची आळवणी केली जाते. तिथे भाव फार महत्वाचा आहे आणि इथे गायकीचा सर्वांना अधिकार असल्याचे संतांनी म्हणून ठेवले आहे. चोखोबांनी तर म्हटले आहे की, ‘खटनट यावे शुद्ध होऊनी जावे । दवंडी पिटी भावे चोखामेळा ।। कुणीही या आणि हरीच्या भजनात शुद्ध होऊन जा.

शब्दब्रह्मातून संतांचा उपदेश
अलीकडे आपण पहातो की, बऱ्याचदा नाट्यगृहात स्टेजवर उभे राहून कीर्तन केले जाते. मात्र, वारीत किंवा फडात तसे केले जात नाही. जमिनीवर घोंगडी टाकून त्यावर उभे राहून कीर्तनाची परंपरा सांभाळली जाते. अभंगातील भाव मनाला शुद्ध करतो. त्यातील शब्दब्रह्माने आपल्याला संतांचा उपदेश मिळतो. तो आपल्यात आपोआप रुजतो आणि त्यानुसार, त्याचे आचरणही होत जाते. देहभानाचा विसर पडतो, सर्व ‘माऊलीमय’ होऊन जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.