दहावीच्या निकालात मुलींची बाजी शहराचा निकाल ९६. ७२ टक्के, मुलींचे उत्तीर्णाचे प्रमाण ९८.०५ टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहावीच्या निकालात मुलींची बाजी 
शहराचा निकाल ९६. ७२ टक्के, मुलींचे उत्तीर्णाचे प्रमाण ९८.०५ टक्के
दहावीच्या निकालात मुलींची बाजी शहराचा निकाल ९६. ७२ टक्के, मुलींचे उत्तीर्णाचे प्रमाण ९८.०५ टक्के

दहावीच्या निकालात मुलींची बाजी शहराचा निकाल ९६. ७२ टक्के, मुलींचे उत्तीर्णाचे प्रमाण ९८.०५ टक्के

sakal_logo
By

---------------------------------------
पिंपरी, ता. २ ः दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. २) दुपारी एक वाजता जाहीर झाला. शहराचा निकाल ९६. ७२ टक्के लागला असून, निकालात १.०१ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. गेल्यावर्षी ९७. ७३ टक्के निकाल लागला होता. यावर्षी ६३० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णांचे प्रमाण ९५. ५६ टक्के तर मुलींच्या उत्तीर्णांचे प्रमाण ९८.०५ टक्के लागला आहे. पुर्नपरीक्षार्थ्यांचा ७२.४२ टक्के निकाल लागला असून, निकालात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी तब्बल १२४ शाळांचा निकाल १०० टक्के होता. यावर्षी २११ पैकी फक्त ९४ शाळांनी निकालाची शंभरी गाठली आहे.

शहरात दहावीच्या परीक्षेला २११ शाळांमधून एकूण १९,२८२ विद्यार्थी बसले होते. यामध्ये १०,२५६ मुले व ८९७६ मुली परीक्षेस बसल्या होत्या. त्यातून ९८०१ मुले व ८८०१ मुली उत्तीर्ण झाल्या. एकूण १८६०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लॅपटॉप व मोबाईलवरच बऱ्याच जणांनी निकाल पाहिला. ज्यांच्याकडे निकाल पाहण्याची सोय नव्हती, अशा विद्यार्थ्यांनी नातेवाईक मित्र मंडळींना फोन करून निकालाची ऑनलाइन प्रत मागितली. काही शाळांवर निकाल पाहण्यासाठी सोय केली होती. निकाल ऐकताच चांगल्या गुणांनी पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला होता. मित्र-मैत्रिणींनी लगेचच एकमेकांना फोन करून निकाल जाणून घेत होते. शाळेत कोण प्रथम आले आहे, याचीदेखील माहिती घेत होते. शुभेच्छा देत होते. नातेवाइकांनी व्हिडिओ कॉल केले. बऱ्याच जणांनी व्हॉटसअपवर स्टेटस ठेवले होते. सेल्फी काढून आनंद व्यक्त केला. काहींनी निकालानंतर हॉटेलमध्ये जाण्याचा बेतही ठरवला. बऱ्याच जणांनी आपापल्या शाळेतील विविध विषयांच्या शिक्षकांना कॉल केले.

गतवर्षीच्या तुलनेत एक टक्क्यांनी घट
गतवर्षी शहराचा निकाल ९७.७३ टक्के लागला होता. त्यामुळे यंदा निकालात १.०१ टक्‍क्‍यांनी घट झाल्याचे दिसले. गेल्यावर्षी १०,६१६ मुले व ८९७८ मुली परीक्षेस बसल्या होत्या. त्यातून १०, ३१६ मुले व ८८३४ मुली उत्तीर्ण होते. एकूण १९१५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मुलांचा निकाल ९७.१७ टक्के तर मुलींचा निकाल ९८.३९ टक्के लागला होता. पुर्नपरीक्षार्थ्यांचा ४९.५२ टक्के निकाल लागला होता. यावर्षी शहरात मुलांचा निकाल ९५.५६ टक्के तर मुलींचा निकाल ९८.०५ टक्के लागला आहे. पुर्नपरीक्षार्थ्यांचा ७२.४२ टक्के निकाल लागला आहे.
पुर्नपरीक्षार्थ्यांच्या निकालात वाढ
------------
शहरात ९५६ पुर्नपरीक्षार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी ६४३ मुले तर ३१३ मुली होत्या. परंतु ९३२ पुर्नपरीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात ६२८ मुले आणि ३०४ मुलींचा समावेश होता. त्यापैकी ६७५ पुर्नपरीक्षार्थ्यांनी यश मिळवले आहे. यापैकी ४२९ मुले व २४६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुले ६८. ३१ टक्के व ८०.९२ टक्‍के मुलींची टक्केवारी आहे. एकूण पुर्नपरीक्षार्थ्यांचा ७२.४२ टक्के निकाल लागला आहे. गेल्यावर्षी शहरात ४२३ पुर्नपरीक्षार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी ३०० मुले तर १२३ मुली होत्या. यातील ४२२ पुर्नपरीक्षार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी २०९ पुर्नपरीक्षार्थ्यांनी पास झाले होते. यापैकी १५२ मुले व ५७ मुली उत्तीर्ण झाल्या होत्‍या. मुले ५०. ८३ टक्के व ४६.३४ टक्‍के मुलींची टक्केवारी होती. गेल्यावर्षी ४९.५२ टक्के निकाल होता. त्या तुलनेत २२.९ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.


महापालिका शाळांचा ९०.४० टक्के
पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या १८ माध्यमिक शाळांचा ९०.४० टक्के निकाल लागला आहे. मुले-मुलींनी यंदा गुणांमध्ये चांगलीच आघाडी मारली. यावर्षी पिंपरी आकुर्डी माध्यमिक उर्दू आणि क्रीडाप्रबोधिनी शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे तर सर्वाधिक कमी रूपीनगर शाळेचा ७५.४० टक्के निकाल लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ०. ६९ टक्क्‍यांनी निकालात घट झालेली आहे. गेल्यावर्षी महापालिकेच्या १८ माध्यमिक शाळांचा ९१.०९ टक्के निकाल लागला होता.


सर्वाधिक कमी निकाल
चिंचवडगावातील पुनरूत्थान समरसता गुरूकुलम शाळेचा ३५ टक्के निकाल लागला आहे. २० परीक्षार्थ्यांनी अर्ज केला होता. २० परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी केवळ ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एका विद्यार्थ्याने एक फर्स्ट क्लास मिळवला आहे. त्यानंतर पाच जणांनी द्वितीय श्रेणी मिळवली आहे.


अनेकांनी घरीच पाहिले निकाल
ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर मोबाइल, लॅपटॉपवर विद्यार्थ्यांनी घरीच निकाल पाहणे पसंत केले. त्यामुळे ‘सायबर कॅफे’मध्ये तुरळक गर्दी होती. मात्र, निकालाची प्रत घेण्यासाठी सायबर कॅफेपाशी विद्यार्थी आले होते. निकाल पाहिल्यानंतर मित्रमैत्रिणींनी जल्लोष केला, तर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या पोस्ट दिवसभर पाहायला मिळाल्या. निकालानंतर लगेच कोणत्या शाखेला, कुठे प्रवेश घेणार, याबाबत चर्चा रंगली होती. काही विद्यार्थ्यांनी सेल्फी काढत सेलिब्रेशन करून, निकालाचा आनंद घेतला.

आठ वर्षांमधील निकाल (टक्‍क्‍यांमध्ये)
२०१६ -८७.९३
२०१७ - ८२.२१
२०१८ -८५.०१
२०१९ -८६.४९
२०२० - ९४.११
२०२१-९९.९२
२०२२ -९७.७२
२०२३ -९६.७२
---