गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

बनावट कागदपत्रे तयार करून
मोठ्या भावाची फसवणूक
पिंपरी, ता. २३ : लहान भावास दुकान चालविण्यास दिले असता, त्याने बनावट कागदपत्रे तयार करून दुकान नावावर केले. बेकायदेशीररीत्या नळजोड घेऊन, दुकान मालक असल्याचे भासवून वीज मीटरही घेत मोठ्या भावाची फसवणूक केली. हा प्रकार चिंचवड येथे घडला.
मारुती आबा सुपेकर (रा. काशी विश्वेश्वर सोसायटी, केशवनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचा भाऊ अनिल आबा सुपेकर (वय ६५, रा. गावडे कॉलनी, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांनी त्यांचे स्वतःचे गावडे कॉलनी येथील एक दुकान त्यांचा लहान भाऊ आरोपीला चालविण्यास दिले. दरम्यान, भावाने महापालिकेच्या कर संकलन विभागात खोटे कागदपत्र व खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून दुकान स्वतःचे नावे केले. बनावट कागदपत्रे व खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून, या दुकानात बेकायदेशीरपणे स्वतःच्या नावाने नळजोड घेतला. तसेच मालक असल्याचे भासवून वीज मीटर घेऊन फिर्यादीची फसवणूक केली.
--------------
कोयता बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
कोयता बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने एकाला अटक केली. ही कारवाई नवी सांगवी येथे करण्यात आली.
आशुतोष दीपक शिर्के (वय २१, रा. कवडेनगर, नवी सांगवी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे कोयता असल्याची माहिती मिळाली असता, सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक कोयता सापडला.

विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा
महिलेशी गैरवर्तन करीत विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार माण येथे घडला.
पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार नीतेश जाधव (वय २६, रा. बोडकेवाडी रोड, हिंजवडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या घरात असताना त्यांच्या कंपनीत काम करणारा आरोपी घरात आला. फिर्यादीला पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी देत असताना फिर्यादीशी गैरवर्तन करून विनयभंग केला.

गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्यांवर गुन्हा
बैल व वासरू कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या तिघांवर एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बाळाप्पा छत्राराप्पा कुरबुड (वय ३३), सौरव राजू गडाप्पा (वय २२, दोघेही रा. गवळी वाडा, खडकी), महंमद शरीफनजीर अहमद कुरेशी (वय ३५, रा. खराळवाडी, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शिवशंकर स्वामी (रा. आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी हे टेम्पोतून दोन बैल, एक वासरू खडकी येथे नईम कुरेशी याच्याकडे कत्तलीसाठी घेऊन जात असताना आढळले. ही कारवाई मोशी जनावर बाजार येथे करण्यात आली.

तरुणीशी गैरवर्तन; एकावर गुन्हा
तरुणीशी गैरवर्तन करीत विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार भोसरी येथे घडला.
याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार मार्तंड भीमराव पवार (वय ३६, रा. भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने वेळोवेळी फिर्यादीचा पाठलाग केला. माझे तुझ्यावर प्रेम असून, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणत
फिर्यादीशी फ्रेंडशिप करण्याबाबत जबरदस्ती केली. दरम्यान, फिर्याद या गव्हाणे वस्ती येथून पायी जात असताना आरोपीने त्यांचा पाठलाग केला. त्या स्पर्धा परीक्षा केंद्रासमोरील रस्त्यावर आल्या असता, अश्लील वर्तन केले. हात पकडून ‘माझे तुझ्यावर प्रेम असून, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, जोपर्यंत तू मला हो म्हणत नाही, तोपर्यंत मी तुझा हात सोडणार नाही'' असे म्हणाला.