पालिकेच्या आठ शाळांना प्रत्येकी ५० लाख जल्लोष शिक्षणाचा उपक्रम ः ‘मॉडेल्स स्कूल’ची उद्या घोषणा, ऑटो क्लस्टरमध्ये आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेच्या आठ शाळांना
प्रत्येकी ५० लाख
जल्लोष शिक्षणाचा उपक्रम ः ‘मॉडेल्स स्कूल’ची उद्या घोषणा, ऑटो क्लस्टरमध्ये आयोजन
पालिकेच्या आठ शाळांना प्रत्येकी ५० लाख जल्लोष शिक्षणाचा उपक्रम ः ‘मॉडेल्स स्कूल’ची उद्या घोषणा, ऑटो क्लस्टरमध्ये आयोजन

पालिकेच्या आठ शाळांना प्रत्येकी ५० लाख जल्लोष शिक्षणाचा उपक्रम ः ‘मॉडेल्स स्कूल’ची उद्या घोषणा, ऑटो क्लस्टरमध्ये आयोजन

sakal_logo
By

पिंपरी, ता. २३ : शालेय, आंतरशालेय, शहर, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी महापालिकेने ‘जल्लोष शिक्षणाचा २०२३’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या १२९ शाळांमध्ये झालेल्या स्पर्धेतून आठ शाळांची ‘मॉडेल्स स्कूल’ म्हणून निवड झाली आहे. त्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये आणि एका सर्वोत्कृष्ट शाळेला एक कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. त्या शाळांची घोषणा व विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण बुधवारी (ता. २५) दुपारी तीन वाजता जल्लोष शिक्षणाचा कार्यक्रमात केली जाईल.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रदर्शित करण्यासाठी, तसेच शाळेच्या मानकांचे आणि सर्वोत्तम पद्धतीचे मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने ‘जल्लोष शिक्षणाचा’ उपक्रमाचे मंगळवारी (ता. २४) व बुधवारी (ता. २५) ऑटो क्लस्टर येथे आयोजन केले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना त्यांच्या आंतरिक क्षमता दाखवता याव्यात. आजच्या काळातील आवश्यक कौशल्‍य व कलागुणांना वाव मिळेल. जल्लोष शिक्षणाचा उपक्रमांतर्गत विद्यार्थी व शाळा स्तरावर स्पर्धा घेण्यात आली. त्यात महापालिकेच्या सर्व शाळांनी सहभाग घेतला. आठ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातून अर्थात झोनमधून एक सर्वोत्कृष्ट शाळा निवडण्यात आली. शालेय आव्हानांच्या निकषांवर एक सर्वसमावेशक रेटिंग दिले गेले. त्यातून एका झोनमधून एक मॉडेल स्कूल निवडण्यात आली आहे. त्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल. सांस्कृतिक कार्यक्रमात ६७ शाळांची निवड झाली आहे.’’

असे आहे नियोजन
- मॉडेल्स ठरलेल्या आठ शाळांना प्रत्येकी ५० लाख देणार
- एका सर्वोत्कृष्ट शाळेला एक कोटी रुपये देणार
- पारितोषिकाच्या रकमेतून काय सुधारणा कराव्यात, हे शाळा ठरवतील
- विद्यार्थ्यांना चौकटीबाहेर विचार करून नवकल्पना मांडण्याची संधी

‘जल्लोष’मधील कार्यक्रम
- प्रदर्शन, विविध प्रकारचे गेम झोन, ग्रंथालय, बुक स्टॉल, फुड स्टॉल, जादूचे प्रयोग, पपेट शो, सांस्कृतिक कार्यक्रम होतील
- शिक्षकांसाठी स्पर्धा आयोजित केली होतील. त्यातील २९ शिक्षकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे
- विद्यार्थ्यांच्या (स्टुडंट चॅलेंज) स्पर्धेत एका शाळेतून प्रत्येकी पाच मॉडेलपैकी एकाची अंतिम स्पर्धेसाठी निवड केली आहे
- महापालिका व खाजगी शाळांसाठी स्पर्धा घेतली, त्यातून ८७ नवकल्पना निवडल्या आहेत

महापालिका शाळा
प्राथमिक ः ११०
माध्यमिक ः १८
संतपीठ ः १
एकूण ः १२९

महापालिका शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक
विद्यार्थी ः ५८,०००
शिक्षक ः १३००
मानधनावर घेतले ः २८५
एकूण शिक्षक ः १५८५

काय, कुठे, कधी, केव्हा...
काय ः जल्लोष शिक्षणाचा
कुठे ः ऑटो क्लस्टर, चिंचवड
कधी ः २४ व २५ जानेवारी
केव्हा ः सकाळी ९ ते सायंकाळी ६
कोणासाठी ः विद्यार्थी, शिक्षक, पालक

कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर खालावला आहे. तो उंचवण्यासाठी व नवकल्पना मांडण्यासाठी जल्लोश शिक्षणाचा उपक्रम राबवीत आहोत. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या आहारावर भर दिला जाणार असून, आठही रुग्णालयांच्या माध्यमातून त्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

- प्रदीप जांभळे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
---