मारहाण करून भंगार व्‍यावसायिकाला लुटले

मारहाण करून भंगार व्‍यावसायिकाला लुटले

भोसरी : दगडाने बेदम मारहाण करून भंगार व्‍यावसायिकाकडील रोकड लुटल्याची घटना भोसरीतील खंडेवस्‍ती येथे घडली. विनोद राजबहादूर विश्‍वकर्मा (रा. लकी स्क्रॅप सेंटर, खंडेवस्‍ती, भोसरी, मूळ- उत्तर प्रदेश) असे या घटनेत मारहाण झालेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव आहे. त्‍यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे खंडेवस्‍ती येथे भंगाराचे दुकान असून तेथे आलेल्या आरोपींनी दुकानाचा दरवाजा वाजविला. फिर्यादी यांनी दरवाजा उघडला असता आरोपी दुकानात शिरले. त्‍यांनी पैशांबाबत विचारणा केली. मात्र फिर्यादी यांनी सांगण्‍यास नकार दिला असता फिर्यादी यांना ढकलून आरोपी आत आले. दरम्यान, फिर्यादी दुकानाच्‍या बाहेर गेल्यानंतर आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. फिर्यादी यांना पकडून दगडाने मारहाण करीत जखमी केले. तसेच त्यांच्या खिशातून २२ हजारांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली.

गुगल रेटिंगच्या बहाण्याने फसवणूक
सांगवी : गुगलवर रेस्टॉरंटला रेटिंग देऊन पैसे कमावण्याबाबत विश्वास संपादन करून एका व्यक्तीची सात लाख ४0 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार सांगवी परिसरात ऑनलाइन माध्यमातून घडला. याप्रकरणी पिंपळे गुरव येथील ३२ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपींनी फिर्यादीला गुगलवर रेस्टॉरंटला रेटिंग देण्याचे काम असून एका रेटिंगसाठी २५ रुपये मिळतील, असे आमिष दाखवले. सुरुवातीला आरोपींनी फिर्यादीस आठ हजार ६९५ रुपये दिले. त्यातून फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना प्रीपेड टास्क देऊन त्यांच्याकडून सात लाख ४० हजार ४०५ रुपये घेतले. त्यानंतर त्यांना परतावा अथवा त्यांची गुंतवणुकीची रक्कम न देता त्यांची फसवणूक केली.

अधिक नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक
रहाटणी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून अधिक नफा मिळण्याचे आमिष दाखवून एकाची पावणे सात लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना रहाटणी येथे घडली. याप्रकरणी रहाटणी येथील ३५ वर्षीय व्यक्तीने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार करणवीर दिल्लोन, वनिता गोयल, एलीस अकाउंट व्यवस्थापक, प्रशांत तिरूमलसेटी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांना सोशल मिडीयावर मेसेज करून त्यांना ट्रेडिंग शिकवण्याबाबत तसेच गुंतवणुकीवर अधिक नफा मिळविण्याबाबत मार्गदर्शन मिळणार असल्याचे सांगितले. त्यानंतर दोन लिंक पाठवून त्यांना एका ग्रुपमध्ये जॉईन करण्यास भाग पाडले. त्यानंतर एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगून त्यावर पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून आरोपींनी सहा लाख ७१ हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली.

बस प्रवासात महिलेची सोन्याचा दागिना चोरीला
वाकड : बस प्रवासात वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याची पाटली चोरट्याने लंपास केली. ही घटना आळंदी ते भूमकर चौक वाकड या दरम्यान घडली. याप्रकरणी धायरी फाटा येथील ६६ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या आळंदी ते भूमकर चौक वाकड या दरम्यान पीएमपी बसने प्रवास करीत होत्या. बस प्रवासात अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील ८० हजार रुपये किमतीची सोन्याची पाटली चोरली.

गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक
दापोडी : गांजा बाळगल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दहा किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त केला. ही कारवाई दापोडी येथे करण्यात आली. सचिन यादव अडागळे (वय ३५, रा. दापोडी), सोहेल बबलू कुरेशी (वय २२, रा. दापोडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचा साथीदार फिरोज ऊर्फ दिलावर शेख याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी सचिन अडागळे हा गांजा विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाल्याने भोसरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून नऊ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त केला. तसेच फिरोज शेख आणि सोहेल कुरेशी यांच्या खोलीतून १० लाख २० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

वाहनाच्‍या धडकेत अनोळखी व्‍यक्‍तीचा मृत्‍यू
पिंपरी : भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत एका अनोळखी व्‍यक्‍तीचा मृत्‍यू झाल्याची घटना बालेवाडी येथे घडली. मंगळवारी मध्‍यरात्रीच्‍या सुमारास अनोळखी व्‍यक्‍तीस अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात अनोळखी व्‍यक्‍तीचा मृत्‍यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनेची माहिती न देता पळून गेला. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

उघड्या दरवाजावाटे लॅपटॉप, मोबाईल चोरीला
ताथवडे : उघड्या दरवाजावाटे घरात शिरलेल्या चोरट्याने घरातून लॅपटॉप व मोबाईल चोरून नेले. ही घटना ताथवडे येथे घडली. याप्रकरणी जयदीप प्रताप गायकवाड (रा. पौर्णिमा अपार्टमेंट, ताथवडे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघडा असताना चोरटा घरात शिरला. घरातून ४० हजारांचा लॅपटॉप आणि दहा हजारांचा मोबाईल असा एकूण ५० हजारांचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
-----------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com