मॉल संस्कृतीने जपली महाराष्ट्राची पारंपारिकता
चिंचवडमधील एल्प्रो मॉलमध्ये आषाढी वारीचा देखावा

मॉल संस्कृतीने जपली महाराष्ट्राची पारंपारिकता चिंचवडमधील एल्प्रो मॉलमध्ये आषाढी वारीचा देखावा

पिंपरी, ता. ५ ः नेहमी नाताळ, दिवाळी व नववर्षानिमित्त शहरातील मॉलमध्ये आकर्षक सजावट केली जाते. मात्र, चिंचवडमधील एल्प्रो मॉलमध्ये या वर्षी आषाढी एकादशीनिमित्ताने माऊलींच्या पालखी सोहळ्याचा देखावा उभारण्यात आला आहे. येथे येणाऱ्या नागरिकांसाठी हा देखावा विशेष आकर्षण ठरत आहे.
विठूनामाचा गजर करत पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीमार्गातील सगळ्यात अवघड टप्पा म्हणजे दिवे घाट. हा घाट चढायला जितका अवघड तितकाच नयनरम्य. हिरवाईने नटलेले डोंगर, हातात भगवी पताका हाती घेऊन चालणारे वारकरी, टाळ-मृदंगाचा नाद आणि अधून मधून पडणाऱ्या आषाढातील सरींनी न्हाऊन गेलेला माऊलींचा रथ अशा वातावरणात हा सोहळा पुढे मार्गस्थ होतो. हा सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून गर्दी लोटते. याच सोहळ्याची भव्य प्रतिकृती चिंचवड येथील एल्प्रो मॉलमध्ये उभारण्यात आली आहे. दिवेघाटात काही वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या पांडुरंगाच्या मूर्तीची प्रतिकृती, संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज यांची प्रतिकृती, पायी चाललेला वैष्णवांचा मेळा याचा देखावा येथे उभारण्यात आला आहे.
दिवाळी, नाताळ, नवीन वर्ष यासारख्या सणांच्या निमित्ताने शहरातील सर्वच मॉलमध्ये नेहमीच आकर्षक रोषणाई व सजावट केली जाते. मात्र, वारकऱ्यांसाठी सर्वात मोठा सोहळा असणाऱ्या आषाढी वारीची प्रतिकृती पहिल्यांदाच एखाद्या मॉलमध्ये उभारण्यात आली आहे. याचे कौतुकही मॉलमध्ये येणारे नागरिक करत आहेत. या देखाव्याचे रिल्स आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही चर्चेत आहेत.
ही प्रतिकृती बनविण्यासाठी जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लागला. वारकरी परंपरेची माहिती घेण्यासाठी या मॉलच्या व्यवस्थापनाकडून पंढरपूर, आळंदी, देहू येथे प्रत्यक्ष भेट देण्यात आली.

‘‘महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. आषाढी पालखी सोहळा हा महाराष्ट्राची सर्वात जुनी परंपरा आहे. सध्याची तरुण पिढी व लहान मुलांना आपल्या संस्कृतीबाबत माहिती मिळावी, वारीबाबत त्यांना आदर निर्माण व्हावा. मॉल सारख्या ठिकाणी एका वेळी हजारो नागरिक एकत्र येतात. त्यामुळे आपल्या संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी हा देखावा एक उत्तम मार्ग आहे.’
- निशांत बन्सल, केंद्र संचालक, एल्प्रो मॉल
फोटोः 30572

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com