अनधिकृत शाळांमुळे पालक धास्तावले
शैक्षणिक नुकसान होणार नसल्याची शिक्षण विभागाची ग्वाही

अनधिकृत शाळांमुळे पालक धास्तावले शैक्षणिक नुकसान होणार नसल्याची शिक्षण विभागाची ग्वाही

Published on

पिंपरी, ता. ५ ः पिंपरी चिंचवड शिक्षण विभागाने शहरातील १२ शाळा अनधिकृत घोषित केल्या आहेत. त्यापैकी काही शाळांसमोर ‘अनधिकृत’ असल्याचा फलक लावला आहे. तर काही शाळांना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे धास्तावलेल्‍या चिंचवडमधील ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलच्या पालकांनी शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त विजय थोरात आणि प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांच्यापुढे गाऱ्हाणे मांडले आहे. दुसरीकडे शिक्षण विभागाने शासन मान्यता नसल्याने संबंधित शाळा अनधिकृत असल्याचा निर्वाळा देत शासन पातळीवर निर्णय घेऊन, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नसल्याची ग्वाही दिली.
महापालिकेने अनधिकृत शाळांची यादी जाहीर करूनही वर्षानुवर्षे १२ अनधिकृत शाळा सुरूच आहेत. ‘सकाळ’ने अनधिकृत शाळांची ‘शाळा’ मथळ्याखाली चार भागांची वृत्‍तमालिका प्रसिद्ध केली. त्यानंतर शिक्षण विभागाने कारवाई केल्यामुळे सहा अनधिकृत शाळा बंद केल्या; तर पाच शाळांच्या बाहेर ‘सदर शाळा अनधिकृत असून, प्रवेश घेऊ नये’ असे फलक लावल्यामुळे आता अनधिकृत शाळांचे धाबे दणाणले आहे. यापैकी चिंचवडमधील ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल ही अनधिकृत घोषित केली आहे. त्या शाळेसमोर अनधिकृत असल्याचे फलक लावल्याने या शाळेतील पालक धास्तावले आहेत. शिक्षण विभागाच्या कारवाईमुळे शाळा बंद केल्यावर आमच्या मुलांचे काय? असा पेच पालकांसमोर आहे. या शाळेत सुमारे ७०० विद्यार्थी शिकत आहेत. वर्षभराची १ लाख ३५ हजार शुल्क भरले आहे. आता आम्ही काय करायचे ? असे गाऱ्हाणे पालकांनी शिक्षण विभागाच्या सहायक आयुक्त विजय थोरात यांच्यासमोर मांडले. मुलांच्या भवितव्याचा प्रश्‍न असल्याचे काही पालकांनी सांगितले.


कोट
‘‘शिक्षण विभागाच्यादृष्टीने ज्या शाळांना शासनाची मान्यता नाही. अशा शाळा अनधिकृतच आहेत. आज ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलचे पालक भेटायला आले होते. शासनस्तरावर विद्यार्थी समायोजनाचा निर्णय घेण्यात येईल.’
-विजय थोरात, सहायक आयुक्त, शिक्षण विभाग

‘‘ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलच्या पालकांचे म्हणणे शिक्षण उपसंचालक यांच्याकडे मांडण्यात येईल. याअगोदरच शिक्षण विभागाने पालकांसाठी अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध केली होती. पालकांनी सजग राहणे आवश्‍यक आहे.’’
-संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.