‘रेफरल नोट’ बंद केल्याने कामगार रूग्ण अडचणीत

‘रेफरल नोट’ बंद केल्याने कामगार रूग्ण अडचणीत

Published on

पिंपरी, ता. ७ ः कामगार विमा योजने (ईएसआय) अंतर्गत लाभार्थी कामगारांना उपचार घेण्यासाठी चिंचवडमधील ईएसआय रुग्णालयाकडून देण्यात येणारी ‘रेफरल नोट’ बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या कामगारांना आता खासगी रुग्णालयाऐवजी सरकारी रुग्णालयात उपचार देण्यात येणार असल्याने खासगी वैद्यकीय खर्चाचा परतावा मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील राज्य कामगार विमा महामंडळाकडून राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातून कामगार आणि त्याच्या कुटुंबीयांस वैद्यकीय उपचार दिले जातात. यापूर्वी ‘ईएसआय’मध्ये कोणतीही शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, हृदय शस्त्रक्रिया तसेच अनेक विमा रुग्णालयात न होणारे उपचार घेण्यासाठी या ‘ईएसआय’ लाभार्थी कामगारांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी ‘रेफरल नोट’ देण्यात येत होती. या कामगारांनी अत्यावश्यक वेळी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यांना वैद्यकीय खर्चाचा परतावा दिला जात होता. पण आता चार महिन्यांपासून ईएसआय रुग्णालयातील कामगारांना उपचार घेण्यासाठी देण्यात येणारी ‘रेफरल नोट’ बंद केली आहे. त्यामुळे त्यांना फक्त सरकारी रुग्णालय, ससून रुग्णालय, यशवंतराव चव्हाण मेमोरिअल (वायसीएम) या रूग्णालयांकडे उपचारांसाठी पाठविण्यात येत आहे. या कामगारांना सरकारी रुग्णालयांत उपचार घेण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे केमोथेरपी घेणारे रुग्ण, डायलिसिस रुग्ण यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच एखाद्या कंपनीत अपघात झालेल्या रुग्णांनासुद्धा ससून रुग्णालयात पाठवले जात असल्याने तेथील वैद्यकीय प्रक्रिया करण्यासाठी जास्त वेळ लागत आहे. त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


कामगारांसाठी फक्त १०० बेड
चिंचवड-मोहननगरमधील ईएसआय रुग्णालयात चाकण, तळेगाव, बारामती, जुन्नर, लोणावळा, हिंजवडी या भागातील कामगार मोठ्या प्रमाणात उपचारांसाठी येतात. तसेच कर्मचारी विमा योजना अंतर्गत अनेक कामगार याचा लाभ घेतात. मात्र, पिंपरी चिंचवड शहरात फक्त १०० खाटांचे रुग्णालय आहे. कामगारांची संख्या पाहता ३०० खाटांची सोय असणे आवश्‍यक आहे. चिंचवडमध्ये मोठ्या इमारती बांधल्या पण त्यात आधुनिक तंत्रज्ञान उपचार पद्धतीची वाणवा दिसून येते.


कर्मचारी राज्य विमा कायदा काय सांगतो?
कर्मचारी विमा योजना ही भारतामध्ये कर्मचारी राज्य विमा कायदा १९४८ अंतर्गत स्थापन केलेली एक व्यापक सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य विमा योजना आहे. आजारपण, मातृत्व, अपंगत्व किंवा रोजगाराच्या दुखापतीमुळे मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय आणि रोख लाभ प्रदान करणे हे प्रामुख्याने उद्दिष्ट आहे. दर महिन्याला वेतनातून ईएसआय रक्कम कपात केली जाते. मात्र, या उद्दिष्टाला हरताळ फासला जात आहे.


कोट
‘‘कर्मचारी विमा अंतर्गत येणाऱ्या रुग्णांना त्यात मुख्यत्वे केमोथेरपी, डायलिसिस, शस्त्रक्रिया, हृदय शस्त्रक्रिया अशा महत्त्वाच्या आणि गरजेच्या उपचार घेणाऱ्या रुग्णांना एक विशेष सेवा म्हणून खासगी खासगी ईएसआय अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी देण्यात येणारी रेफरल नोट पुन्हा सुरु करून कामगारांना दिलासा द्यावा.’’
-राहुल कोल्हटकर, खासगी कामगार

‘‘कामगार विमा योजने (ईएसआय) अंतर्गत लाभार्थी कामगारांना खासगी रुग्णालयात अतिविशिष्ट किंवा ज्या सोयी आमच्याकडे नाहीत, अशा उपचारांसाठी पाठविण्यात येत होते. परंतु आता उपचिकित्सा आयुक्त डॉ. रेशमा वर्मा यांनी ईएसआयधारक कामगारांना खासगी रुग्णालयाऐवजी सरकारी रुग्णालयाकडे उपचारासाठी पाठविण्याच्या सूचना केल्‍या आहेत.’’
-वर्षा सुपे, वैद्यकीय अधीक्षक, ईएसआय रुग्णालय, मोहननगर

फोटोः 30784

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.