रेल्वे, एसटी प्रवाशांसाठी पीएमपीची ‘रातराणी’ धावणार

रेल्वे, एसटी प्रवाशांसाठी पीएमपीची ‘रातराणी’ धावणार

पिंपरी, ता. ७ : पीएमपीएमएल प्रशासनाने पिंपरी-चिंचवडमध्ये रातराणी बस सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्यात पुणे स्थानक ते निगडी या मार्गावर ही सुविधा लागू करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळेस येणाऱ्या रेल्वे, एसटी बस आणि ट्रॅव्हल्स यांच्या वेळा लक्षात घेऊन रातराणी बसचे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. तसे आदेश पीएमपीएमएलचे अध्यक्ष संजय कोलते यांनी दिले आहेत. या सुविधेमुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचा औद्योगिक विकास झाल्यामुळे केवळ राज्यच नव्हे; तर देशभरातील असंख्य नागरिक येथे नोकरी-धंद्यानिमित्त स्थायिक झाले आहेत. त्यातील अनेकांना वेळोवेळी बाहेरगावी ये-जा करावी लागते. त्यासाठी त्यांच्याकडून एसटी, रेल्वे आणि ट्रॅव्हल्सचा वापर केला जातो. मात्र, बऱ्याच रेल्वे आणि एसटी प्रवाशांना रात्रीच्या शहरांतर्गत प्रवासाच्यावेळी गैरसोयीला तोंड द्यावे लागते.
पिंपरी आणि चिंचवड रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस रेल्वे थांबत नसल्यामुळे प्रवाशांना पुणे स्थानकावर उतरावे लागते. काही एसटी बस वल्लभनगरला न थांबता थेट शिवाजीनगर आगारात थांबत आहेत. निगडीतून रात्री सव्वाअकराची शेवटची बस जाते. मात्र, त्यानंतर पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची बसअभावी गैरसोय होत आहे. तशीच परिस्थिती रात्री अकरानंतर पुण्यातून पिंपरी-चिंचवडकडे येणाऱ्या प्रवाशांची निर्माण होत आहे. रात्री एसटी किंवा रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना पिंपरी-चिंचवडकडे येण्यासाठी रिक्षा किंवा ओला, उबेर कॅबचा आधार घ्यावा लागतो. यावेळी रिक्षाचालकांच्‍या मनमानी कारभाराला प्रवाशांना तोंड द्यावे लागत आहे. ओला आणि उबेरचे दर रात्री जास्त असल्‍याने खिशाला भुर्दंड पडत आहे. त्यामुळे, पुणे शहराप्रमाणे पिंपरी- चिंचवडमध्येही रातराणी बस सेवा सुरू करण्याची मागणी होत होती. त्‍यानुसार, प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

प्रतिसादानुसार तिकिटाचा दर
या मार्गावर बसची संख्या आणि तिकिटाबाबतनंतर अधिक स्‍पष्टता येणार आहे. नियमित तिकिटाच्‍या दरापेक्षा २५ टक्‍के तिकिटाचा दर अधिक असतो. मात्र, प्रवाशांच्‍या प्रतिसादानंतर त्‍याबाबतचा निर्णय होणार असल्‍याचे प्रशासनाने म्‍हटले आहे. तसेच बसस्‍थानकेही निश्चित केली जाणार आहेत.

पुण्यावरून पिंपरीकडे जाण्यासाठी रात्रीच्‍यावेळी बसची सुविधा नव्‍हती. त्‍यामुळे, रिक्षा किंवा ओला उबेर करावी लागत होती. त्‍यासाठी जादा खर्च येत होता. रातराणी बसच्‍या सुविधेचा निर्णय चांगला असून त्‍यामुळे गैरसोय टळेल.
- अक्षय कदम, प्रवासी

पीएमपीकडून रात्रीच्यावेळेस रातराणी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तो योग्य आहे. प्रवाशांची मागणी पाहून त्‍यांची गैरसोय दूर करण्याचे काम प्रशासनाने केले आहे. ही सेवा कायम सुरू ठेवणे गरजेचे आहे.
- अनिकेत चांदणे, नोकरदार


पुणे स्‍थानक ते पिंपरी ही रातराणी बस सेवा सुरू केली जाणार आहे. त्‍यासाठी नियोजन सुरू आहे. कुठे बसस्‍थानके घ्यायची, तिकिटांचे दर प्रवाशांच्‍या प्रतिसादानुसार ठरविण्यात येणार आहे. त्यानंतर त्‍याबाबत अधिक स्‍पष्टता येईल.
- सतीश गव्‍हाणे, मुख्य वाहतूक अधिकारी, पीएमपीएमएल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com