औद्योगिक क्रीडा स्पर्धेचा विस्तार आनंददायी ः ब्रिगेडियर (निवृत्त) जठार

औद्योगिक क्रीडा स्पर्धेचा विस्तार आनंददायी ः ब्रिगेडियर (निवृत्त) जठार

पिंपरी, ता. ७ ः ‘‘औद्योगिक क्रीडा संघटना अधिक चांगले काम करत आहे. तिचे कार्य विस्तारत आहे. याचा मला खूप आनंद होत आहे.’’, असे कौतुकोद्‍गार ब्रिगेडियर (निवृत्त) रघुनाथ जठार यांनी काढले.
औद्योगिक क्रीडा संघटनेच्यावतीने, पुण्यात आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात सर्वसाधारण विजेत्या टाटा मोटर्स संघ आणि उपविजेत्या बजाज ऑटो, आकुर्डी संघाला ब्रिगेडियर (निवृत्त) जठार यांच्या हस्ते नुकतेच करंडक प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय धावपटू रमेश तावडे, महाराष्ट्र रणजी संघाचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ, टाटा मोटर्सचे माजी क्रीडा अधिकारी व फुटबॉलपटू आर.के.जयराजन, किर्लोस्कर कमिन्स इंडियाचे माजी उपाध्यक्ष (मनुष्यबळ विकास) उल्हास चंद्रात्रे व संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नागेशकर हे यावेळी उपस्थित होते.
क्रीडाप्रेमी उद्योजक व खेळाडू यांच्या कष्टावर संघटनेने ६० वर्षे पूर्ण केली आहेत. त्याचा मला खूप आनंद होत असल्याचे चंद्रात्रे यांनी सांगितले. तर विविध कंपन्यांना एकत्र आणून पुण्यातील कामगारांना आपले क्रीडा नैपुण्य दाखवण्यासाठी ही संघटना स्थापन झाली. त्याचा फायदा सगळ्यांना होत असल्याचे मत रमेश तावडे यांनी व्यक्त केले. मिलिंद गुंजाळ यांनीही यावेळी विचार मांडले.
२०२३-२४ वर्षाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये टाटा मोटर्सने ६० गुण मिळवून सर्वसाधारण विजेतेपद तर बजाज ऑटो, आकुर्डी संघाने ४० गुण मिळवून उपविजेतेपद पटकावले. विजेत्या संघाकडून टाटा मोटर्स क्रीडा समितीचे अध्यक्ष शशिकांत कात्रे व युनियन प्रतिनिधी रितेश पिसाळ यांनी तर बजाज ऑटोकडून उपविजेतेपदाचा करंडक सोमनाथ यांनी स्वीकारला. याप्रसंगी स्पर्धांना प्रायोजकत्व देणाऱ्या सॅण्डविक एशिया, फॉरविया फॉरेशिया, एसकेएफ, प्राज इंडस्ट्रीज, ॲटलास कॉप्को आदी दहा कंपन्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
संघटनेचे सचिव वसंत ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले. नरेंद्र कदम यांनी सूत्रसंचालन केले. हरी देशपांडे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. प्रदीप वाघ यांनी आर्थिक अहवालाचे वाचन केले. विजय हिंगे, बालाजी नानिवडेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

नवीन स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर
याच समारंभात संघटनेचे २०२४-२५ चे क्रीडा वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागेशकर म्हणाले,‘‘२०२३-२४ मध्ये संघटनेच्या स्पर्धांमध्ये जवळजवळ १५० कंपन्यांच्या २ हजार १०० च्यावर खेळाडूंनी १४ खेळांच्या स्पर्धांमधून आपला सहभाग नोंदवला. तसेच महिला खेळाडूंचा या स्पर्धांमध्ये मोठा सहभाग राहिला, ही बाब उल्लेखनीय आहे. औद्योगिक क्रीडा संघटना अजून चांगल्या प्रकारे स्पर्धेचे आयोजन करेल, याचा मला विश्वास वाटतो.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com