‘लाडकी बहीण’साठी १२३ मदत केंद्र
उद्यापासून शहरात प्रारंभ, प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती

‘लाडकी बहीण’साठी १२३ मदत केंद्र उद्यापासून शहरात प्रारंभ, प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती

पिंपरी, ता. ८ ः ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज स्वीकृतीसाठी शहरात विविध ठिकाणी १२३ केंद्र बुधवारपासून (ता. १०) सुरू केले जाणार आहेत. त्यांची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी असेल. अर्ज भरण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अर्ज स्वीकृती केंद्रांवर समन्वयक, डाटा एन्ट्री ऑपरेटर (संगणक चालक), मदतनीस, सुरक्षा कर्मचारी अशा चार ते पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती असेल, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
योजनेची व अर्ज प्रक्रियेची माहिती महापालिकेच्या सर्व सोशल मीडिया हॅन्डल्स, संकेतस्थळावर दिली आहे. शिवाय, माहितीदर्शक स्टँडीज, फ्लेक्स, बॅनर्स, व्हीएमडी, व्हिडिओ, मेसेजेस, जिंगल्स, भित्तिपत्रके, हस्तपत्रिका आणि पॅम्प्लेट्सद्वारे दिली जात आहे. महापालिकेच्या ५७ शाळा, १७ करसंकलन विभागीय कार्यालये, आठ क्षेत्रीय कार्यालयांसह सभागृहे, नाट्यगृहे आदी १२३ ठिकाणी अर्ज स्वीकृती केंद्र चालू केले जाणार आहेत. योजनेच्या अटी-शर्ती, पात्र-अपात्र निकषांची माहिती लाभार्थींना देण्यासाठी आणि कागदपत्रांची छाननी, दैनंदिन अहवालाच्या पूर्ततेसाठी केंद्रांवर व्यवस्थापक, मुख्य लिपिक, समूह संघटक, समुदाय संघटक, मदतनीस यांची नेमणूक केली आहे. केंद्रांवर फिरते शौचालय, पाण्याची व्यवस्था करून दैनंदिन साफसफाई केली जाणार आहे. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर समन्वयासाठी नोडल अधिकारी नियुक्त केले असल्याचेही आयुक्त सिंह यांनी सांगितले.

आवश्यक कागदपत्रे
आधारकार्ड, अधिवास किंवा जन्म किंवा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक. अधिवास प्रमाणपत्र नसल्यास महिलेचे १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला असावा. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य असेल. अडीच लाखाच्या आत उत्पन्न प्रमाणपत्र असावे किंवा पिवळे वा केशरी रेशनकार्ड; हमीपत्र, आधार लिंक असलेले बँक पासबुक, अर्जदाराचे छायाचित्र असावे.

अर्ज भरण्याची पद्धत
योजनेचे अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ॲप किंवा सेतू केंद्राद्वारे ऑनलाइन भरले जाऊ शकतात. पात्र महिलेस ऑनलाइन नारीशक्ती दूत ॲपद्वारे अर्ज करता येईल. ऑनलाइन अर्ज करता येत नसल्यास अंगणवाडी केंद्र किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात किंवा सेतू सुविधा केंद्रात भरता येईल. अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. अर्ज ऑनलाइन भरल्यानंतर पोचपावती दिली जाईल.

योजनेच्या माहितीसाठी टोल फ्री हेल्पलाइन ः १८१

शिबिरांची ठिकाणे
अ क्षेत्रीय कार्यालय ः कापसे उद्यान नाना नानी पार्क ज्येष्ठ नागरिक संघ हॉल मोरवाडी, राष्ट्रमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन मोहननगर, करसंकलन कार्यालय पांडुरंग काळभोर हॉल आकुर्डी, महापालिका शाळा भाटनगर पिंपरी.
ब क्षेत्रीय कार्यालय ः नूतन इमारत किवळे गावठाण, महापालिका प्राथमिक शाळा वाल्हेकरवाडी, ब क्षेत्रिय कार्यालय चिंचवड, महापालिका प्राथमिक शाळा बीआरटी रस्ता काळेवाडी
क क्षेत्रीय कार्यालय ः बुद्धविहार संजय गांधीनगर मोशी, जाधववाडी जुनी शाळा, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, बुद्धविहार खंडेवस्ती, बालनगरी बालाजीनगर भोसरी, अण्णा भाऊ साठे समाज मंदिर नेहरूनगर, सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह खराळवाडी, रामायण मैदान सभागृह जाधववाडी चिखली
ड क्षेत्रीय कार्यालय ः विरंगुळा केंद्र पिंपळे निलख, विरंगुळा केंद्र पोलिस कॉलनी वाकड, समाज मंदिर पुनावळे, सह्याद्री आदिवासी महिला सभागृह सृष्टी चौक पिंपळे गुरव
ई क्षेत्रीय कार्यालय ः वाघेश्वर महाराज ज्येष्ठ नागरिक संघ विरंगुळा केंद्र चऱ्होली, सैनिक भवन दिघी, बहुउद्देशीय इमारत बोपखेल, सखूबाई गवळी गार्डनमधील हॉल, परशुराम गवळी बॅडमिंटन हॉल दिघी रस्ता भोसरी, पीसीएमटी चौक बहुउद्देशीय इमारत हॉल गव्हाणेवस्ती भोसरी, सर्वे नंबर २२९/१ एन. बी. फुले बिल्डींग दुसरा मजला भैरवनाथ मंदिर सभागृह भोसरी गावठाण
फ क्षेत्रीय कार्यालय ः टाऊन हॉल घरकुल चिखली, महापालिका शाळा पार्किंग म्हेत्रे वस्ती चिखली, प्रबोधनकार ठाकरे प्राथमिक शाळा रुपीनगर, बाळासाहेब ठाकरे सभागृह नाना नानी पार्क यमुनानगर निगडी, शिवतेजनगर सांस्कृतिक हॉल चेरी स्वीटमागे, महापालिका शाळेजवळील हॉल तळवडे गावठाण
ग क्षेत्रीय कार्यालय ः माध्यमिक विद्यालय थेरगाव, लक्ष्मीबाई बारणे उद्यान थेरगाव, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान रहाटणी
ह क्षेत्रीय कार्यालय ः महात्मा फुले वाचनालय लांडेवाडी भोसरी, सरदार वल्लभभाई पटेल बॅडमिंटन हॉल वल्लभनगर पुणे, शहीद भगतसिंग महापालिका शाळा दापोडी, उर्दू शाळा कासारवाडी, महापालिका पब्लिक स्कूल प्राथमिक शाळा क्रमांक ५४ पिंपळे गुरव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महापालिका शाळा जुनी सांगवी
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com