सावित्रींच्‍या लेकींची परदेशात भरारी
महापालिकेकडून शिक्षणासाठी विद्यार्थिनींना दरवर्षी दीड कोटींची मदत

सावित्रींच्‍या लेकींची परदेशात भरारी महापालिकेकडून शिक्षणासाठी विद्यार्थिनींना दरवर्षी दीड कोटींची मदत

प्रदीप लोखंडे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ९ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍यावतीने परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना आर्थिक हातभार लावला जात आहे. गेल्‍या दीड वर्षात महापालिकेच्‍या समाज विकास विभागाच्‍यावतीने ११५ विद्यार्थिनींना पात्र ठरवून प्रत्‍येकी दीड लाखांची आर्थिक मदत केली आहे. यासाठी महापालिकेने मंजूर केलेल्‍या तरतुदीतून एक कोटी ७२ लाख ५० हजार रुपये मंजूर केले आहेत. त्‍यामुळे शहरातील विद्यार्थिनींना परदेशात शिक्षणासाठी मोठा हातभार लागत आहे.
परदेशात शिक्षण घेण्याची अनेकांची इच्‍छा असते. मात्र, आर्थिक अडचणींमुळे अनेकांच्‍या स्‍वप्‍नांवर पाणी फिरत आहे. शहरातील गरजू आणि गरीब विद्यार्थिनींना परदेशात शिक्षण घेता यावे, यासाठी महापालिकेच्‍यावतीने आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. स्‍वर्गीय प्रमोद महाजन यांच्‍या नावाने ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शहरातील पात्र विद्यार्थिनींना महापालिका प्रथम वर्षासाठी दीड लाख रुपयांची आर्थिक मदत करत आहे. आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता केल्‍यास पात्र ठरवून या योजनेअंतर्गत मदत मिळत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍यावतीने दरवर्षी दीड कोटींची आर्थिक तरतूद या योजनेसाठी केली जात आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये १२७ विद्यार्थिनींनी महापालिकेकडे अर्ज केला होता. त्‍यामध्ये २८ जणांना कागदपत्रांच्‍या पूर्ततेअभावी अपात्र ठरविण्यात आले. ९९ विद्यार्थिनींना पात्र ठरवून अर्थसाहाय्य देण्यात आले. या वर्षी दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार १ कोटी ४८ लाख ५० हजार रुपयांच्‍या अर्थसहाय्याचे वाटप करण्यात आले आहे. जानेवारी २०२४ ते अद्यापपर्यंत ३३ अर्ज प्राप्‍त झाले असून त्‍यापैकी सहा अर्ज अपात्र ठरले आहेत तर १६ जणांना अर्थसाहाय्य मिळाले आहे. तर या वर्षी ११ अर्ज प्रस्‍तावित असून, लवकरच त्‍यांनाही अर्थसाहाय्य दिले जाणार असल्‍याचे महापालिकेने सांगितले. या वर्षी या योजनेअंतर्गत एकूण १ कोटी ६५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्‍यापैकी आतापर्यंत २४ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

चौकट : या आहेत मर्यादा -
- दीड लाखांची तुटपुंजी रक्‍कम.
- विद्यार्थिनींमध्ये जनजागृतीचा अभाव.
- महापालिकेची आर्थिक तरतूद कमी.

योजनेच्‍या अटी व शर्ती -
१. अर्जदाराने अर्जासोबत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमधील आधारकार्ड जोडणे आवश्यक.
२. अर्जदाराने अर्जासोबत मतदार ओळखपत्र / मतदार यादीची प्रत या दोन्हीपैकी एक पुरावा जोडावा.
३. परदेशातील उच्च शिक्षणाकरिता निवड झाल्याबाबतची कागदपत्रे तसेच पासपोर्ट आणि व्हिसा इत्‍यादीची प्रत.
४. प्रवेश घेतल्याचा पुरावा. उदा. बोनाफाईड व महाविद्यालयाचे आयडी कार्ड, प्रवेशपत्र
५. मागील शैक्षणिक वर्षाची पास झालेल्या गुणपत्रकाची साक्षांकित प्रत आवश्यक.
६. अर्जदाराने बँक पासबुक जोडणे आवश्यक आहे.

चौकट : अर्थसाहाय्य झालेल्‍या विद्यार्थ्यांची संख्या -
वर्ष आलेले अर्ज अपात्र लाभ दिलेले अर्थसाहाय्य केलेली रक्‍कम
२०२३-२४ १२७ २८ ९९ एक कोटी, ४८ लाख, ५० हजार
२०२४-२५ ३३ ६ १६ २४ लाख

कोट :
‘‘पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍यावतीने परदेशात शिक्षण घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य दिले जाते. दीड लाख रुपयांची मदत केली जाते. विभागाच्‍यावतीने दीड वर्षात ११५ जणींना मदत केली आहे. आणखी काही अर्ज प्रस्‍तावित आहेत. त्‍यांनाही मदत करण्याची पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- तानाजी नरळे, सहायक आयुक्‍त, समाज विकास विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका.
---------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com