मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रारंभ
थेरगावमध्ये कार्यक्रम; आयुक्त सिंह यांच्या हस्ते पोच पावती प्रदान

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रारंभ थेरगावमध्ये कार्यक्रम; आयुक्त सिंह यांच्या हस्ते पोच पावती प्रदान

Published on

पिंपरी, ता. १० ः ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी शहरातील महिलांना जास्तीतजास्त सुविधा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यांच्या वेळेची बचत करणे तसेच गर्दी टाळण्यासाठी शहरात १२३ सुविधा केंद्र, पुरेशा मनुष्यबळासह आजपासून कार्यान्वित केली आहेत. आवश्यकता भासल्यास सुविधा केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा महापालिकेतर्फे थेरगाव येथील ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात प्रारंभ झाला. त्यावेळी आयुक्त सिंह बोलत होते. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपायुक्त अण्णा बोदडे, समाज विकास विभागाचे सहायक आयुक्त तानाजी नरळे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, कार्यकारी अभियंता नितीन निंबाळकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, समूह संघटक वैशाली खरात, रेशमा पाटील आदी उपस्थित होते. पात्र लाभार्थ्यांना आयुक्तांच्या हस्ते अर्ज स्वीकृती पोच पावती देण्यात आल्या.
आयुक्त सिंह म्हणाले, ‘‘लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी शहरातील मुख्य चौक आणि गर्दीची ठिकाणे निश्चित करून, १२३ सुविधा केंद्र स्थापन केली आहेत. आठ क्षेत्रीय कार्यालये, महापालिकेच्या ५७ शाळा, १७ करसंकलन कार्यालये, मुख्य चौक, गर्दीची ठिकाणे, बाजारपेठ यासारखी ४१ शिबिर ठिकाणे निश्चित केली आहेत. ३१ ऑगस्टपूर्वी ऑनलाइन नोंदणी पूर्ण करण्याचा मानस आहे.’’ अजिंक्य येळे यांनी प्रास्ताविक केले. प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.

‘‘लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी रहिवासी आणि उत्पन्नाच्या दाखल्याची अट सरकारने कमी केली असून, पिवळ्या अथवा केशरी शिधावाटप पत्रिकेच्या आधारे लाभार्थ्यांना लाभ घेता येणार आहे. यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. योजना राबविणे तसेच योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महिला बचत गटांची मदत घेण्यात येणार असून, घरोघरी जाऊन नोंदणीही केली जाणार आहे.
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.