उष्णतेपासून बचावासाठी ‘हीट ॲक्शन प्लॅन’

उष्णतेपासून बचावासाठी ‘हीट ॲक्शन प्लॅन’

पिंपरी, ता. ११ ः जागतिक तापमान वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच, अतिउष्णता वाढीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी महापालिका ‘हीट अॅक्शन प्लॅन’ तयार करत आहे. यामध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असून त्यांनी आपले अभिप्राय २० जुलैपर्यंत कळवावेत, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
हीट अॅक्शन प्लॅन योजनेचे पुनरावलोकन करण्यासाठी तसेच योजनेसंदर्भात येणाऱ्या सूचना, प्रश्‍नांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. नागरिकांनी नोंदविलेला अभिप्राय तापमान वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

हीट ॲक्शन प्लॅनची गरज का?
जगासह देशात उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दरवर्षी जागतिक तापमानातही वाढ होत आहे. याचा नागरिकांच्या जीवनावर परिणाम होत आहे. त्यामुळे तापमान बदल व वाढत्या उष्णतेबाबत पुरेशी काळजी आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे. शिवाय, उद्भवणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे. उष्णतेमुळे अतिसारासारखे पचनक्रियेशी संबंधित आजार आणि उष्माघात होऊ शकतो. त्वचेसंदर्भात समस्या उद्भवू शकतात. वातावरणातील कमाल तापमान चार ते पाच डिग्रीपेक्षा अधिक वाढल्यास उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली जाते. त्यासाठी हीट ॲक्शन प्लॅन तयार करणे आवश्यक आहे.

शहरातील स्थिती
शहरात झाडांचे प्रमाण जास्त असले तरी रात्रीच्या वेळी तापमान कमी होण्यास अधिक वेळ लागत असल्याचे अभ्यासात समोर आले आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी प्रशासकीय आणि शहरी नियोजन करणे गरजेचे आहे. सार्वजनिक पायाभूत सुविधा, जनजागृती, क्षमता निर्माण आणि तापमानाचा सर्वात जास्त परिणाम होणारे समुदाय ओळखून योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

महापालिकेचे नियोजन
महापालिकेने तयार केलेला हीट अॅक्शन प्लॅन हा उष्णतेच्या संबंधित आजार आणि त्यामुळे होणारे मृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर उष्णता वाढीचा दुष्परिणाम होऊ नये, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्लॅनच्या आराखड्यात पूर्व चेतावणी प्रणालीची अंमलबजावणी, शीतकरण केंद्राची स्थापना आणि जागृती मोहिमांची अंमलबजावणी या उपायांचा समावेश आहे. त्यात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

हीट ॲक्शन प्लॅनचे उद्दिष्ट
- उष्णतेशी संबंधित आजार आणि मृत्यूच्या घटना कमी करून सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न करणे
- सामुदायिक लवचिकता वाढवणे, लोकसंख्येला उष्णतेच्या लहरींच्या प्रभावांना तोंड देण्यासाठी आणि त्यातून सावरण्यासाठी सक्षम करणे
- अत्यावश्यक सेवा आणि पर्यावरणीय कार्यांचे सातत्य सुनिश्चित करून पायाभूत सुविधा आणि अतिउष्णतेच्या घटनांचे प्रतिकूल परिणाम कमी करणे

अधिक माहितीसाठी...
- हीट ॲक्शन प्लॅनबाबत https://www.pcmcindia.gov.in/marathi/heat-action-plan.php या संकेतस्थळाला नागरिकांनी भेट द्यावी
- नागरिकांनी आपला अभिप्राय https://www.pcmcindia.gov.in/marathi/pdf/Template-for-feedback.pdf यावर नोंदवावा
- काही अडचण आल्यास disastermgmt@pcmcindia.gov.in मेल आयडीवर मेल करून संपर्क साधावा

‘‘अतिउष्णतेच्या घटना सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा आणि पर्यावरणासाठी महत्त्वपूर्ण आव्हाने उप्तन्न करतात. ज्याचा सामाजिक आणि आर्थिक कल्याणासाठी परिणाम होतो. हवामान बदलामुळे जागतिक तापमान वाढत असताना, उष्णतेच्या लहरींची वारंवारता, तीव्रता आणि कालावधी वाढण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे अतिउष्णतेशी संबंधित धोके वाढतात. हे धोके कमी करण्यासाठी हीट ॲक्शन प्लॅन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.’’
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com