‘साह्यकडा’च्या गिर्यारोहकांची पाच किल्ल्यांना गवसणी

‘साह्यकडा’च्या गिर्यारोहकांची पाच किल्ल्यांना गवसणी

पिंपरी, ता.६ ः हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकास ३५० वर्षे होत आहेत. त्यानिमित्त साह्यकडा ॲडवेंचरच्या गिर्यारोहकांनी किल्ले सिंहगडपासून चालत किल्ले राजगड, किल्ले तोरणा, किल्ले लिंगाणा ते किल्ले रायगड अशी चार दिवस पदभ्रमंती करत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.
मोहिमेचे नेतृत्व अनुभवी गिर्यारोहक बाबाजी चौधरी यांनी केले.‌ किरण दौंडकर, विलास कुमकर, धनाजी पाटील, श्रीराम भरगंडे, निशांत आवडे यांनी सहभाग घेऊन मोहिम पूर्ण केली. त्यांना श्रीकांत लोमटे, सुरेश अहिरे आणि श्रीराम पवळे यांचे सहकार्य लाभले.
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत प्रचलित चंगळवाद टाळून काहीतरी हटके करण्याच्या उद्देशाने तसेच शिवराज्याभिषेकाच्या साडेतीनशे वर्षानिमित्त वरील मोहीम आखण्यात आली. या मोहिमेतील सगळा प्रवास हा डोंगरदऱ्यांतील पायवाटेने झाला. त्यानुसार, रानवाटांची माहिती गोळा करण्यात आली. जवळपास ९० ते १०० किलोमीटरची ही अत्यंत खडतर वाट असल्याने वेळ आणि अंतरे ठरवून मुक्कामाची ठिकाणे ठरविण्यात आली.
या मोहिमेत कोंढाणा ऊर्फ सिंहगड किल्ला. स्वराज्याची पहिली राजधानी आणि महाराणी सईबाई यांची समाधी असलेला श्रीमान राजगड किल्ला. स्वराज्याचे तोरण म्हणून ओळख असलेला प्रचंडगड ऊर्फ तोरणा किल्ला. शत्रूच्या उरात धडकी भरवणारा आणि स्वराज्याचे कारागृह असलेला लिंगाणा किल्ला. तसेच मराठा साम्राज्याचा केंद्रबिंदू आणि शिवतीर्थ किल्ले रायगडाचा समावेश होता.


काही सुखद क्षण आणि थरार..
० सिंहगडावरील छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांचे स्मारक.
० राजगडावरील महाराणी सईबाई यांची समाधी. पद्मावती देवी मंदिर.
० झुंजार बुरुजाकडून राजगडाच्या वाटेवरील निसरडी माती, अंगावर येणारे चढउतार
० रडतोंडी बुरूज मार्गे किल्ले तोरणा गडावर चढाई.
० निखळलेले दगड, तीव्र उतार आणि खोलच खोल कातळ टप्पे असलेली बोराट्याची नाळ.
० हिरकणीवाडीतील नवीन वर्षाच्या पहिल्या सूर्योदयाचे दर्शन.
० शिवतीर्थ किल्ले रायगडावरील महादरवाजा, हत्ती तलाव, गंगासागर, होळीचा माळ, बाजार पेठ, जगदीश्वर मंदिर, भवानी कड्याचे दर्शन.
० राजदरबारात महाराजांच्या मूर्तीसमोर नतमस्तक.

खोल कातळ टप्पे अन् चांदण्यांचे पांघरूण !
गवताची कुसळे, निसरडी माती, अंगावर येणारे चढ-उतार, सह्याद्रीतील डोंगररांगेतील दाट जंगलातील पायवाट, कडक ऊन, घोंगावणारा वारा, क्षितीजावरील सूर्यास्त, बोराट्याच्या नाळेतील खोल कातळटप्पे अशी निसर्गाची विविध रुपे गिर्यारोहकांनी अनुभवली. रायलिंग पठारावरील रात्रीच्या मुक्कामात आकाशातील शुभ्र चांदण्यांचे पांघरूण घेत झोपण्याची अनुभव अवर्णनीय असाच राहिला.

PNE24T94166

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com