तळवडे दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मदतीची प्रतीक्षा

तळवडे दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मदतीची प्रतीक्षा

पिंपरी, ता. ६ ः तळवडे येथील स्पार्कल कँडल मेणबत्ती कंपनीतील स्फोटात मृत्यू झालेल्या चौदा महिला कामगारांच्या मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली. मात्र, या दुर्घटनेला एक महिना उलटला तरी वारसांना अद्याप मदत मिळाली नाही. कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाला, अर्थसाहाय्य कधी मिळणार? या प्रतीक्षेत वारस आहेत. दरम्‍यान, तहसीलदार कार्यालयाकडून १४ जणांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यापैकी पाच जणींना मुख्यमंत्री सहायता निधी मंजूर झाला आहे.
तळवडे येथील रेडझोन हद्दीत बेकायदा सुरू असलेल्या मेणबत्ती कंपनीत आठ डिसेंबर रोजी स्फोट होऊन आग लागली. त्यात सहा महिला कामगारांचा जागीच होरपळून मृत्यू झाला, तर दहा जण जखमी झाले होते. त्यातील आठ महिलांचा उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेत एकूण १४ महिला कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर केली. मात्र, २१ दिवस होऊनही राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अद्याप मृतांच्या वारसांना मिळालेली नाही. त्यामुळे सरकारने जाहीर केलेली मदत तरी लवकर मिळावी, अशी मागणी नातेवाइकांमधून केली जात आहे. दरम्यान, कारखाना मालकाने अग्निशामक दलासह कोणतीच परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे या घटनेला कारखाना मालकासह महापालिका प्रशासनही तितकेच जबाबदार असल्याचा आरोप असताना मृतांच्या वारसांना महापालिकेने मदत केलेली नाही.

आग दुर्घटनेत सुरुवातीला नऊ महिलांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला तत्काळ प्रस्ताव पाठविला. तो प्रस्ताव राज्य सरकारकडे गेला आहे. पाच मृतांच्या कोणत्या नातेवाइकांना मदत द्यायची यावरून संभ्रम होता. त्यांच्या नातेवाइकांचे प्रतिज्ञापत्र घेतल्यानंतर त्याचा स्वतंत्र प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला. तो प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. आता चौदा मृतांपैकी पाच मृतांच्या नातेवाइकांना मदत जाहीर झाली आहे. लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे तहसीलदार अर्चना निकम यांनी सांगितले.

निधी वारसांना मिळणार
तहसीलदार कार्यालयाकडून चौदा जणांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यापैकी पाच जणींना मुख्यमंत्री सहायता निधी मंजूर झाला आहे. त्यात पहिल्या टप्प्‍यात रमा देवेंद्र आबदार, पूनम अभय मिश्रा, कलमादेवी सूरज प्रजापती, लता भारत दंगेकर आणि मंगल बाबासाहेब खरबडे या मृतांच्या वारसांना पाच लाखांचा निधी मंजूर झाला आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया मुंबई शाखेतून वारसांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. त्यासाठी २५ लाख मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर झाल्याचे आदेश तीन जानेवारी रोजी तहसीलदार कार्यालयाला प्राप्त झाले आहेत.

पंतप्रधान सहायता निधीसाठी
पंतप्रधान सहायता निधी मिळविण्यासाठीही पीएम संकेतस्थळावर ऑनलाइन माहिती यापूर्वीच पाठवली होती. तलाठी यांच्याकडून एफआयआर, मृत्यू दाखला, शवविच्छेदन (मरणोत्तर तपासणी), पोलिस पंचनामे अशा प्रकारची कागदपत्रे भरण्यास अडचण येत होती. आता पुन्हा नव्याने कलर प्रिंट कागदपत्रे अपलोड केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com