‘यू-डायस प्लस’वरील विद्यार्थी नोंदणीचा गोंधळ

‘यू-डायस प्लस’वरील विद्यार्थी नोंदणीचा गोंधळ

आशा साळवी ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ६ : शासन अनुदानासह विद्यार्थी संख्या निश्चित करण्यासाठीच्या ‘यु-डायस प्लस’ पोर्टलवरील विद्यार्थी नोंदणीचा गोंधळ चार महिन्यांपासून सुरू आहे. वारंवार सूचना देऊनही अनेक शाळांकडून अद्यापही ही प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने विद्यार्थी संख्या निश्‍चिती रखडली आहे.
केंद्र सरकारकडून राज्यातील सर्व मान्यताप्राप्त शाळांची माहिती संगणकीकृत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेतंर्गत ‘यु-डायस प्लस’ नावाच्या नव्या पोर्टलवर सर्व माहिती दहा नोव्हेंबरपर्यंत भरण्याच्या सूचना सर्व शाळांना देण्यात आल्या होत्या. या माहितीच्या आधारेच केंद्र सरकारकडून समग्र शिक्षा योजनेचे वार्षिक नियोजन, शिष्यवृत्ती, पोषण आहार, मोफत पुस्तके, गणवेश आदी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

सतरा हजार ४२२ विद्यार्थी नोंदणी रखडली
शिक्षण विभाग शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांना मागील तीन-चार महिन्यांपासून ‘यू-डायस’ चे काम पूर्ण करण्यासाठी सातत्याने सूचना देत आहेत. विद्यार्थी प्रमोशन, दुसऱ्या शाळेतून विद्यार्थी घेऊन ते अपडेट करणे, आधार क्रमांक जुळविणे अशा अनेक तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थी नोंदणीची विविध टप्प्यावरील प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण झालेली नाही. विशेष म्हणजे शहरातील तब्बल १७ हजार ४२२ विद्यार्थ्यांची नोंदणी राहिली होती. मागील तीन महिन्यांपासून शिक्षण विभागाकडून सातत्याने सूचना देऊनही ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. वास्तविक ३० सप्टेंबर हा विद्यार्थ्यांचा अंतिमपट गृहीत धरला जातो. परंतु; अद्यापही विद्यार्थी नोंदणी पूर्णत्वास गेली नसल्याने पुढील प्रक्रिया देखील लांबणीवर पडणार आहे. यामुळे शंभर टक्के विद्यार्थ्यांची यु-डायस प्रणालीमधील पडताळणी करून यु-डायस प्रणालीवर वर्ग करण्याची कार्यवाही लांबली आहे.

पोर्टलवर ताण
शिक्षण विभागाने शाळांचे वेतन थांबविण्यासह प्रशासकीय कारवाईचा सज्जड इशारा जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कमलाकांत म्हेत्रे यांनी दिल्याने सर्व शाळा एकाच वेळेस राहिलेल्या थोड्याफार विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याच्या कामाला लागल्याने यु-डायस प्लसच्या पोर्टलवरही ताण आल्याचे दिसले. त्यामुळे पोर्टल दिवसभरात अडचणी येत असल्याने अजूनही शहरातील शाळांचे काम बाकी राहिले आहे. जिल्ह्याचा परफॉर्मिंग ग्रेडिंग इंडेक्स (पीजीआय), अर्थसंकल्पीय तरतूद यांवर या प्रलंबित कामाचा परिणाम होत आहे.

‘‘गेली अनेक महिने यु-डायस प्लस व आधार वैधता प्रलंबित कामकाज पूर्ण करणे बाबत सातत्याने लेखी, तोंडी, सूचना, आढावा सभा, इत्यादीद्वारे निर्देश देण्यात आलेले आहेत. तरी सर्व संबंधित शाळांनी सदर प्रलंबित कामकाज जसे विद्यार्थी अपडेशन, शून्य पट शाळा, स्कूल प्रोफाइल, टीचर प्रोफाइल, ड्रॉप बॉक्स काउंट आदी प्रलंबित बाबी तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत.’’
- कमलाकांत म्हेत्रे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com