उद्योगनगरीतील रोजगारावर ऑटोमेशनची कुऱ्हाड 
‘एआय’चेही आव्हान ः अनेक कंपन्यांमध्ये रिक्त जागा अथवा नवीन भरतीही बंद

उद्योगनगरीतील रोजगारावर ऑटोमेशनची कुऱ्हाड ‘एआय’चेही आव्हान ः अनेक कंपन्यांमध्ये रिक्त जागा अथवा नवीन भरतीही बंद

पिंपरी, ता. २५ ः उद्योगनगरीतील मोठे उद्योग व त्यांना कच्चा माल पुरविणारे लघू व सूक्ष्म उद्योग हे अनेकांच्या रोजगाराची प्रमुख साधने आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अत्याधुनिक तंत्रज्ञान अर्थात ऑटोमेशनमुळे मोठ्या व लहान उद्योगांकडून मनुष्यबळात कपात केली जात आहे. काही ठिकाणी रिक्त अथवा नवीन भरती केली जात नाही. त्यामुळे उद्योग क्षेत्रातील रोजगाराची उपलब्धता कमी झाली आहे. अशातच ‘एआय’चाही (कृत्रिम बुद्धिमत्ता) परिणाम उद्योग क्षेत्रावर होणार का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

उत्पादन वाढले, मनुष्यबळ घटले
ऑटोमेशनची सुरवात विसाव्या शतकाच्या शेवटी झाली. परदेशातील हे तंत्रज्ञान भारतात आल्यानंतर बाजारात स्वतःचे स्थान टिकविण्यासाठी अनेक वाहन उत्पादक कंपन्या, औद्योगिक कंपन्या यांनी त्याचा अवलंब केला. ऑटोमेशनद्वारे अधिक अचूकतेने उत्पादन करता येऊ लागले. या नवीन तंत्रज्ञानामुळे उत्पादनांची गुणवत्ता सुधारली, उत्पादनही वाढले. मात्र, सर्वच काही ऑटोमॅटिक होऊ लागल्याने तुलनेने मनुष्यबळाची आवश्‍यकता कमी भासू लागली. यातूनच अनेक कंपन्यांनी आपले मनुष्यबळ कमी केले, तर काही कंपन्यांनी नवीन भरती बंद केली. त्यामुळे रोजगारासाठी उद्योग क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या कामगारवर्गाला मात्र फटका बसला.

जुन्या जागांवर भरती नाही
शहरातील अनेक नामांकित कंपन्यांनी ऑटोमेशन आल्यानंतर लगेचच मनुष्यबळ कमी केले नाही. मात्र नवीन जागाही भरल्या नाहीत. याशिवाय निवृत्त झालेल्या कामगारांच्या जागांवरही भरती केली जात नाही. त्यामुळे रोजगार तीस टक्क्यांनी घटला. परिणामी, सध्या पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या अभियंत्यांची संख्या वाढली आहे. दुसरीकडे जागा कमी झाल्यामुळे रोजगार मात्र कमी झाला आहे.

‘एआय’चा परिणाम काय?
ऑटोमेशनमुळे उद्योगांमध्ये रोजगार कपात झाली असली, तरी नव्याने आलेल्या एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानामुळे औद्योगिक क्षेत्रावर फारसा परिणाम होणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. उद्योगक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असला तरी अनेक बाबींसाठी मनुष्यबळाची गरज भासते. मात्र, हे काम ‘एआय’मुळे औद्योगिक क्षेत्रात कशापद्धतीने बदल होणार आहे, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. त्यामुळे सध्या तरी ज्या प्रकारे ‘एआय’चा परिणाम आयटी क्षेत्रावरील नोकऱ्यांवर होत आहे. तसा परिणाम उद्योग क्षेत्रावर होणार नसल्याचे तज्ज्ञ सांगतात.
ऑटोमेशनमुळे अत्याधुनिक मशिनचा वापर वाढल्याने एका कामगाराला दोन किंवा तीन मशिन चालविणे शक्य झाले आहे. मात्र, मोठ्या व बहुराष्ट्रीय कंपन्या वगळता ऑटोमेशनचा पूर्णपणे वापर करणाऱ्या फार कमी कंपन्या शहरात आहेत. त्यामुळे रोजगारनिर्मिती जरी कमी झाली असली तरी ही आकडेवारी २० टक्क्यांपेक्षा अधिक नसल्याचे उद्योगक्षेत्रातील मानवी संसाधन विभागात काम करणाऱ्या तज्ज्ञांचे मत आहे.

‘‘जी कामे करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्‍यकता होती. ती कामे आता सीएनसी मशिनद्वारे होऊ लागली आहेत. उत्पादनाची गुणवत्ता व उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी सर्वच कंपन्या आता ऑटोमेशनकडे वळल्या आहेत. साहजिकच मनुष्यबळ कमी झाले आहे.
- शिशुपालसिंह तोमर, अध्यक्ष, टाटा मोटर्स एम्प्लॅाईज युनियन, पिंपरी

‘‘एआय तंत्रज्ञान हे उद्योग क्षेत्रात कशा पद्धतीने वापरले जाऊ शकते, याबाबत स्पष्टता नाही. मात्र, जी कामे मनुष्यबळासाठी जिकिरीची आहेत, त्या ठिकाणी या तंत्रज्ञानाचा नक्की वापर केला जाऊ शकतो. कोणतेही तंत्रज्ञान आल्यावर त्याचा बाऊ न करता त्याचे फायदे-तोटे समजून घ्यायला हवेत. कर्मचारीवर्गानेही सध्याच्या काळात वेळोवेळी स्वतःला अपडेटेड ठेवणे गरजेचे आहे.

- कामगार अभ्यासक
-----------


‘‘परदेशातील उद्योगांमध्ये जेवढा ऑटोमेशनचा अवलंब केला जात आहे, तेवढा भारतीय उद्योगांमध्ये केला जात नाही. ऑटोमेशनसाठी अत्याधुनिक साधनसामग्रीची गरज भासते. त्यासाठी फार मोठी गुंतवणूक करावी लागते. त्यामुळे मोठ्या किंवा मल्टिनॅशनल उद्योगांना हे शक्य आहे पण जे लहान उद्योग इतर उद्योगांवर अवलंबून आहेत. त्यांना मात्र आपल्या ग्राहकांकडून मिळणाऱ्या ऑर्डरनुसार काम करावे लागते. त्यामुळे असे उद्योग ऑटोमॅटिक मशीनकडे वळत नाहीत. ऑटोमेशनमुळे नोकऱ्या कमी झाल्या असल्या तरी हे प्रमाण अगदीच नगण्य आहे.

- मानवी संसाधन अधिकारी, बहुराष्ट्रीय कंपनी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com