तळेगाव दाभाडेमध्ये महामार्गालगत कचऱ्याचे ढीग

तळेगाव दाभाडेमध्ये महामार्गालगत कचऱ्याचे ढीग

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता.२५ : येथे पुणे-मुंबई महामार्गालगतच्या रिकाम्या जागेत कचरा टाकण्यात येत असल्याने कचऱ्याची समस्या सर्वत्र वाढत आहे. पाऊस पडल्याने कचरा कुजून दुर्गंधी पसरली असून नागरिक त्रस्त झाले आहेत. याशिवाय प्लॅस्टिकचा कचरा खाल्ल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे, कचरा टाकणाऱ्यांवर नागरिक कारवाईची मागणी करीत आहे.
जैन पार्श्र्वप्रज्ञालयासमोरील जागेपासून ते पेट्रोल पंपापर्यत कचऱ्याचे ढीग पडले आहे. महामार्गालगतची छोटे-मोठे ढाबे, टपऱ्यांमधील टाकाऊ खाद्यपदार्थ, प्लॅस्टिक पिशव्या, थर्माकोलच्या डिश, कपडे, बॅगा, खाद्यपदार्थ टाकण्यात येत आहेत. परिसरात चरायला आलेली मोकाट जनावरे टाकाऊ अन्नाच्या वासाने कचरा खाण्यासाठी तुटून पडतात. खाद्यासह प्लॅस्टिक पिशव्या त्यांच्या पोटात जात असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जनावरे रस्त्यावर येत असल्याने महामार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या रस्त्याचा वापर पार्श्वप्रज्ञालय, पणन मंडळ व सीआरपीएफमधील नागरिक करीत असतात. येथून जाताना कचऱ्याची दुर्गंधी व त्यावर बसलेल्या माशांमुळे रोगराई वाढण्याची शक्यता वाढल्याने तातडीने संबंधित विभागाने कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

काय करता येईल ?
- प्लॅस्टिकविरोधात जनजागृती करणे जरूरीचे.
- प्लॅस्टिक वापरावरील बंदीची प्रभावी अंमलबजावणी हवी.
- जनावरांना सकस आहार, क्षार मिश्रणे व जंतनाशके नियमित द्यावीत.
- जनावरांना चरायला मोकाट सोडू नये.
- शिल्लक अन्नाची योग्य ती विल्हेवाट लावावी.

जनावरांनी प्लॅस्टिक खाल्याने ते जनावरांच्या पोटात जमा होते. पोटात साचल्याने पचनक्रिया बिघडून गॅस तयार होतात. पोट फुगते. त्याने, जनावरांच्या फुफ्फुस व हृदयावर ताण पडतो. दुभत्या जनावरांची तब्बेत खालावते व त्यांची दुध देण्याची क्षमता कमी होते. प्लॅस्टिकचे विघटन होत नसल्याने ते काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते.
- डॉ.उदय भोसले, पशुधन विकास अधिकारी, तळेगाव दाभाडे
PNE24U15841

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com