‘मावळ’साठी ५० उमेदवारी अर्ज दाखल
आज छाननी होणार, अर्ज माघारीची शेवटची तारीख २९ एप्रिल

‘मावळ’साठी ५० उमेदवारी अर्ज दाखल आज छाननी होणार, अर्ज माघारीची शेवटची तारीख २९ एप्रिल

पिंपरी, ता. २५ ः मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. २५) अर्थात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेला २० इच्छुकांनी २४ अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे दाखल केले. एकूण ३८ जणांचे ५० अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी (ता. २६) सकाळी अकरापासून अर्जांची छाननी होईल. यावेळी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे (शिवसेना), महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष), माधवी जोशी (वंचित बहुजन आघाडी), यशवंत पवार (क्रांतिकारी जय हिंद सेना), प्रशांत भगत (भारतीय जवान किसान पार्टी), ज्योतीश्वर भोसले (बळिराजा पार्टी), रफीक कुरेशी (देश जनहित पार्टी), गोपाळ तंतरपाळे (इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी), संतोष उबाळे (भीमसेना पक्ष), महेशसिंग ठाकूर (धर्मराज्य पार्टी), शिवाजी जाधव (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), पंकज ओझरकर (अखिल भारतीय परिवार पार्टी), गोविंद हेरोडे (बहुजन मुक्ती पार्टी), राजाराम पाटील (बहुजन समाज पार्टी), राजेंद्र छाजछिडक (राष्ट्रीय वाल्मीकी सेना पार्टी, भारतीय राष्ट्रीय जनता पार्टी संयुक्त आघाडी), रफिक मैनुद्दीन सय्यद (आझाद समाज पार्टी), भाऊ अडागळे (महाराष्ट्र मजूर पक्ष) यांच्यासह अपक्ष इंद्रजित गोंड, मुकेश अगरवाल, प्रफुल्ल भोसले, मधुकर थोरात, राहुल मदने, तुषार लोंढे, सुहास राणे, मनोज गरबडे, उमाकांत मिश्रा, लक्ष्मण अढाळगे, इक्बाल इब्राहिम नावडेकर, संजय सुभाष वाघेरे, अजय लोंढे, राजू पाटील, दादाराव कांबळे, चिमाजी शिंदे, राजेंद्र काटे, हजरत इमामसाहब पटेल, मारुती कांबळे, संजोग रवींद्र पाटील, विजय ठाकूर यांचा समावेश आहे. अर्ज माघारीची शेवटची तारीख २९ एप्रिल आहे.

नामसाधर्म्य ः महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या आडनावाशी साधर्म्य असलेले संजय सुभाष वाघेरे (रा. दिंडोरी, जि. नाशिक) आणि नावाशी साधर्म्य असलेले संजोग रवींद्र पाटील (रा. उरण) यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत.

पक्ष बदल ः बहुजन समाज पार्टीचे उमेदवार राजाराम पाटील (रा. अलिबाग, जि. रायगड) आहेत. २०१९ च्या निवडणुकीत ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. आता वंचितच्या उमेदवार माधवी जोशी (रा. आंबिवली, जि. रायगड) आहेत.

निरीक्षकांकडून पाहणी
मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक बुदिथी राजशेखर यांनी गुरुवारी (ता. २५) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेची समक्ष पाहणी केली. त्यानंतर पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे मतदान यंत्र स्ट्रॉंगरूम, तेथील सुरक्षाव्यवस्था, सीसीटीव्ही कार्यप्रणाली आणि सर्व कक्षाच्या कामकाजाची माहिती घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com