टोलनाका स्थलांतरामुळे 
स्थानिकांच्या समस्या वाढणार

टोलनाका स्थलांतरामुळे स्थानिकांच्या समस्या वाढणार

सोमाटणे, ता. २९ ः द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका स्थलांतरामुळे वाहतूक कोंडी कायमची सुटणार आहे. परंतु, शेतकऱ्यांसह स्थानिक प्रवाशांच्या समस्या वाढणार आहेत.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका येथील मर्यादित जागेमुळे दोन्ही बाजूस प्रत्येकी नऊ लेन उपलब्ध असून, लेनची संख्या वाढवणे शक्य नसल्याने टोल भरताना दररोज सकाळ-संध्याकाळ तसेच सुट्टीच्या दिवशी वाहनांची संख्या वाढल्यावर वाहतूक कोंडी नियमित ठरलेली होती. सर्व वाहनास फास्टॅग असतानाही वाहनांच्या अधिक संख्येमुळे टोल भरण्यासाठी प्रवाशांना टोलनाक्यावर अधिक वेळ थांबावे लागत होते. यातून मार्ग काढण्यासाठी व वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी रस्ते विकास महामंडळाच्या वतीने उर्से टोलनाक्याचे स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार गेल्या सहा महिन्यांपासून उर्से गावच्या हद्दीतच मुंबई बाजूला दोन किलोमीटर अंतरावर नवीन टोलनाक्याच्या बांधणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले असून, शेड बसवण्याचे काम सुरू आहे. रस्ते विकास महामंडळाच्या माहितीनुसार, नवीन टोलनाक्यावर प्रत्येक बाजूला चौदा लेनची सुविधा असल्याने वाहतूक कोंडी कायमची सुटणार असल्याने वाहनचालक, प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

टोलनाक्याचे स्थलांतर झाल्यानंतर प्रवासी, स्थानिक नागरिक, शेतीमाल उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. सध्याचा टोलनाका हा उर्से-वडगाव फाटा जोडणाऱ्या रस्त्यालगत असल्याने अनेक मावळवासीय मुंबईला ये-जा करणारे नागरिक आपले वाहन टोलनाक्याजवळील पार्किंगमध्ये उभे करत व मुंबईवरून आल्यावर टोलनाक्याजवळ उतरून घराकडचा प्रवास करत. मालकीचे वाहन नसलेले प्रवासी अल्पप्रवासी भाडे देऊन रिक्शाचा वापर करत. शिवाय टोलनाक्याजवळ २४ तास पोलिस गस्त असल्याने रात्रीची लुटमारीची भीती नव्हती. परंतु, टोल नाक्याचे स्थलांतर झाल्यानंतर उर्से फाट्यावर उतरणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे होणार असून, हा भाग निर्मनुष्य होऊन लूटमारीचे प्रकार सुरू होण्याची भीती वाढणार आहे. नवीन टोलनाक्यापासून उर्से रस्त्याचे अंतर वाढणार असल्याने, भाडेवाढ होऊन येथे उतरून घरी जाणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. खासगी वाहनास सध्याच्या भाड्यापेक्षा अनेकपट भाडे द्यावे लागणार असल्याचे मत स्थानिक शेतकरी गुलाब घारे व सुभाष धामणकर यांनी व्यक्त केले.

PNE24U16641

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com