पाण्याच्या शोधात वन्यप्राणी चौराई डोंगरावर

पाण्याच्या शोधात वन्यप्राणी चौराई डोंगरावर

सोमाटणे, ता.२९ ः डोंगरदऱ्यातील पाणी संपल्याने चौराई देवीजवळील पाणवठ्यावर जंगली प्राण्यांचा वावर वाढला असून देवीचे पुजारी त्यांच्यासाठी पाण्याची मडकी भरुन ठेवत आहेत.
त्यामुळे, त्या पाण्याने त्यांची तहान भागत आहे.
गेल्या महिनाभरापासून उष्णतेचा पारा नेहमीपेक्षा अधिक वाढल्याने चौराई डोंगरातील डोंगरदऱ्यातील साठलेले पाणी पूर्ण संपले आहे. परिणामी, चौराई डोंगरातील वन्य प्राण्यांची पाण्यासाठी धडपड सुरु झाली आहे. अनेक मोठ्या वन्यप्राण्यांनी पवना, इंद्रायणी नदीकडे स्थलांतर केले असून जंगलातील लहान प्राण्यांना पवना, इंद्रायणीकडे जाण्यासाठी द्रुतगती मार्ग किंवा पुणे-मुंबई महामार्ग ओलांडणे कठीण असल्याने त्यांना चौराईदेवीजवळील पाणवठा हा एकच मार्ग राहिला आहे. त्यामुळे, गेल्या महिनाभरापासून तेथे अनेक वन्यजीवांचा रात्री वावर वाढला आहे. देवदर्शनाला आलेले अनेक भाविक दिवसा पाणवठ्याजवळील देवीच्या मंदिरात जात असल्याने प्राण्यांना पाण्यासाठी येथे येणे अशक्य होते. त्यावर, मात करण्यासाठी व चौराई डोंगरावर वास्तव्याला असणारे पक्षी, मोर, डुक्कर, ससे, भेकर, तरस, माकड यासह सर्व प्राण्यांची पाणी समस्या सोडवण्यासाठी देवस्थानचे पुजारी काळूराम कुंभार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी डोंगराच्या वेगवेगळ्या भागांत दोन किलोमीटर अंतरावर मातीची मडकी ठेवली आहेत. दररोज ते सकाळी व संध्याकाळी डोक्यावरुन पाणी वाहून नेत डोंगराची उभी चढण चढत जाऊन ते मडके भरुन ठेवतात. गेल्या दोन महिन्यापासून त्यांचा हा उपक्रम सुरु असून त्यांच्या या उपक्रमामुळे चौराई डोंगरावरील अनेक जंगली प्राण्यांची तहान भागली जात आहे.

डोंगरावरील कातळ खडकात साठलेले सर्व पाणी संपले आहे. तहानलेल्या प्राण्यांना पाणी मिळावे, यासाठी माझी धडपड चालू आहे. वन विभागाने सोमाटणे खिंडीजवळील शंकरवाडी नंबर दोन लगतच्या जंगलात दोन पाणवठे व पाणी साठवण टाकी बांधली. परंतु, त्यात सध्या पाणी साठवले जात नसल्याने जंगली प्राण्यांची पाणी समस्या वाढली आहे.
- काळूराम कुंभार, पुजारी, चौराई देवस्थान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com