‘अपना वतन’च्या विरोधात जोडे मारो आंदोलन

‘अपना वतन’च्या विरोधात जोडे मारो आंदोलन

पिंपरी, ता. ४ : काळाखडक झोपडपट्टीचे शासनामार्फत पुनर्वसन केले जात आहे. मात्र, या परिसरात वास्तव्यास नसतानाही अपना वतन या संघटनेकडून प्रकल्पाला विरोध होत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी मंगळवारी संघटनेच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले.
काळाखडक झोपडपट्टीचे शासनामार्फत पुनर्वसन होत आहे. मात्र, त्याला विरोध करणारे अपना वतन संघटनेचे पदाधिकारी सिद्दीकी शेख, जितेंद्र जुनेजा व संघटनेतील इतर पदाधिकारी हे काळाखडक येथील रहिवासी नाहीत. मात्र, संघटनेकडून सामान्य जनतेच्या मनात शासनाबद्दल गैरसमज निर्माण करून दिशाभूल करण्यात येत आहे.
दरम्यान, संघटनेतर्फे प्राधिकरण कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला होता. यामुळे मिळकतीवर राहणाऱ्या नागरिकांची दिशाभूल होत आहे. याचा निषेध करत स्थानिक नागरिकांकडून मंगळवारी सांघटनेच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. याबाबत याबाबत वाकड पोलिस ठाण्यात स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असणारे निवेदन देण्यात आले आहे.
या प्रकरणी नागरिकांमध्ये वादविवाद तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची जबाबदारी संघटनेची असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या बाबत पत्रकारांशी बोलताना सिद्दीक शेख म्हणाले, ‘‘स्थानिकांनी तक्रार केल्याने मी पूर्वी आंदोलन केले होते. आता बिल्डरच्या सांगण्यावरून काही लोकांनी माझ्या व संघटनेच्या विरोधात आंदोलन केले आहे. लवकरच मी त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे.’

या प्रकल्पास काळाखडक येथील स्थानिकांनी विरोध केल्यास त्याबाबत आमचे काही मत नाही. मात्र, येथील रहिवासी नसतानाही लोकांना भडकावून या प्रकल्पास खोडा घालणाऱ्यांबाबत आमचा विरोध आहे. शासनाकडून प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळणार आहे. इतरांनी स्थानिक नागरिकांना भडकावून खोडा घालू नये.
- अमोल देवकर, स्थानिक रहिवासी.

मे. जय एंटरप्राईजेस हे जमीन मालक असून, काळाखडकचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांचा एकमेव प्रस्ताव आमच्याकडे दाखल झाला आहे. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य एक दोन विकसक प्रयत्न करत असल्याचे आमच्या कानावर आहे. मात्र, नियमानुसार जागा मालकाला प्रथम प्राधान्य दिले जाते. त्यामुळे मे. जय एंटरप्राईजेस यांचा प्रथम संधीने प्रस्ताव मान्य केलेला आहे.
- नीलेश गटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com