पेमेंट अपडेटच्या नावाखाली 
ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

पेमेंट अपडेटच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

वाकड : एमएनजीएलचे पेमेंट अपडेट करण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइनद्वारे ८९ हजारांची फसवणूक करण्यात आली. जयंत गणपतराव कानगुडे (रा. सफायर पार्क, पार्क स्ट्रीट, वाकड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादी यांना फोन करून एमएनजीएलचे पेमेंट अपडेट करण्यासाठी मी आपणास प्रोसेस सांगतो त्याप्रमाणे अपडेट करा, असे सांगितले. फिर्यादी यांना प्ले स्टोअरवरून एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर ट्रायल पेमेंट म्हणून शंभर रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगितले. हे करीत असताना फिर्यादी यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी त्यांनी आरोपीस शेअर केला असता, आरोपीने काही वेळातच फिर्यादी यांच्या गुगल पे मधून ८९ हजार ६८ रुपये स्वतःच्या खात्यावर ट्रान्स्फर करून घेऊन फिर्यादीची फसवणूक केली.

फ्लॅट विक्रीचे बनावट दस्त तयार करून फसवणूक
पिंपरी : फ्लॅट विक्रीचे बनावट दस्त तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी शशिकांत बबन भिलारे (रा. म्हाताळवाडी, भूगाव रोड, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार सहदुय्यम निबंधक कार्यालय मुळशी-२ हिंजवडी येथे घडला. याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांच्या पतीचा आरोपीने विश्वास संपादन केला. हर्षवर्धन अपार्टमेंट नावाच्या बांधकाम साइटमध्ये फ्लॅट क्रमांक १०१ हा विक्री करण्याबाबत व्यवहार करून त्यांच्याकडून १९ लाख ९७ हजार ७१२ रोख व धनादेशाद्वारे स्वीकारले. फिर्यादी यांना १०१ क्रमांकाच्या फ्लॅटचे खरेदीखत करून देणे आवश्यक असताना त्यांच्या बांधकाम साइटमध्ये १०५ क्रमांकाचा फ्लॅट नसतानाही १०५ च्या फ्लॅटचा विक्री ड्राफ्ट तयार केला. फ्लॅट क्रमांक १०१ ऐवजी १०५ हा विक्री करून बनावट दस्त तयार करून फिर्यादी यांची फसवणूक केली.

जादा परताव्याच्या आमिषाने महिलेला २७ लाखांचा गंडा
पिंपरी : गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेची २७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार पिंपरी येथे ऑनलाइन पद्धतीने घडला. याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मार्लिना, शाम कपूर व विविध बँक अकाउंटधारक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी यांना आरोपींनी एका व्हॉटसअप ग्रुपमध्ये दाखल केले. तेथे त्यांना गुंतवणुकीबद्दल सांगितले. यावेळी जास्त परताव्याचे आमिष दाखवून फिर्यादीला २७ लाख ३२ हजार रुपये भरायला सांगितले. त्यानंतर फिर्यादीला कोणताही परतावा न देता त्यांची फसवणूक केली.

शेअर्स खरेदीच्या बहाण्याने ३५ लाखांची फसवणूक
पिंपरी : शेअर्स खरेदी करून देण्याच्या बहाण्याने आदित्य तुकाराम रानभरे (रा. सेक्टर क्रमांक २६, प्राधिकरण, निगडी) यांची ३५ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी रानभरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आदित्य पाटील, मनोज कुमार व इतर दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांना एका व्हॉटसअप ग्रुपवरून पी. टी. ॲप्लिकेशनमध्ये जाऊन शेअर्स विकून पैसे काढून घेण्यास सांगितले. फिर्यादी यांनी ते पैसे काढले. मात्र, त्यांच्या खात्यात ती रक्कम दाखल झाली नाही. फिर्यादी यांनी आरोपीला फोन करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही. या प्रकरणात फिर्यादी यांची ३५ लाख ४० हजार ३१० रुपयांची फसवणूक झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com