उमेदवार खर्च तपासणीसाठी वेळापत्रक

उमेदवार खर्च तपासणीसाठी वेळापत्रक

पिंपरी, ता. २९ ः मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांनी ठेवलेल्या दैनंदिन खर्च विषयक तपासणी केली जात आहे. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात खर्च व्यवस्थापन कक्ष सुरू केला आहे. तिथे दैनंदिन खर्च तपशील सादर करण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे, अशी माहिती पुणे जिल्हा निवडणूक खर्च देखरेख पथक प्रमुख पद्मश्री तळदेकर यांनी दिली.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी प्राधिकरणातील इमारतीच्या पाचव्या मजल्यावर निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष सुरू केला आहे. तीन टप्प्यांत तपासणी होणार आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या खर्चाची नोंद केली जात आहे. उमेदवारी खर्चाबाबत सोमवारी बैठक झाली. त्यास तळदेकर यांच्यासह निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर, निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मतराव खराडे, निवडणूक सहायक तथा तहसीलदार अभिजीत जगताप, मनीषा तेलभाते, सचिन मस्के, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या खर्च तपासणी पथक प्रमुख अश्विनी मुसळे, सविता नलावडे आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचार खर्चाची मर्यादा ९५ लाख रुपये आहे. मतदारसंघामध्ये ३३ उमेदवार निवडणूक लढवत असून, त्यांचे दररोजच्या खर्चाचे लेखे आणि खर्चाच्या पावत्या या लेखांकन पथकाकडे जमा केल्या जातात. त्याचवेळी व्हिडिओ नियंत्रण व पाहणाऱ्या पथकाकडून आलेल्या अहवालानुसार शॅडो रजिस्टरमध्ये उमेदवाराचा रोजचा प्रचारखर्च नोंदला जातो. इतर पथकांकडून रोकड अथवा इतर जप्ती झाल्यास त्याचीही नोंद लेखा पथकाकडून घेतली जाते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सुधांशू राय यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष, फिरते भरारी पथक, स्थिर सनियंत्रण पथक, व्हिडिओ सनियंत्रण पथक, व्हिडीओ पाहणारे पथक कार्यरत आहेत.

दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक
- ३ मे ः पहिली तपासणी
- ७ मे ः दुसरी तपासणी
- ११ मे ः तिसरी तपासणी
(तपासणी वेळ ः सकाळी १० ते सायंकाळी ५)

उमेदवारांना सूचना
उमेदवारांनी निवडणूक कामकाजाच्या दैनंदिन खर्चाचा तपशील विहित वेळेत तपासणीसाठी सादर करावा. दैनंदिन खर्चाचा तपशील, बँक पासबूक व सर्व देयकांच्या मूळ पावत्यांसह खर्च सादर करावा, अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी सर्व उमेदवारांना दिल्या आहेत. तपासणी दिनांकादिवशी उमेदवार अथवा त्यांच्या अधिकृत खर्च प्रतिनिधींनी उपस्थित राहावे. तपासणी वेळी दैनंदिन खर्चाची नोंदवही अद्ययावत नोंदवून तपासणीसाठी सादर करावी. अनुषंगिक कागदपत्रे सोबत आणावीत. तपासणी दिनांकादिवशी अनुपस्थित राहिल्यास अथवा खर्चामध्ये तफावत असल्यास संबंधितांवर नियमाधिन कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com