ताथवडे पुनावळे भुयारी मार्गाचा विस्तार आधांतरीच

ताथवडे पुनावळे भुयारी मार्गाचा विस्तार आधांतरीच

पिंपरी, ता. १२ ः कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील पुनावळे, ताथवडे भुयारी मार्गाचा विस्तार करण्याची मागणी केल्या काही वर्षांपासून नागरिक करीत आहेत. मात्र, या भुयारी मार्गाचे काम किवळे हिंजवडी एलिव्हेटेड कॉरिडॉर या प्रकल्पातील भाग असून, त्यासाठी वेगळ्या असा प्रस्ताव नसल्याची माहिती पुढे आली आहे. या एलिव्हेटेड कॉरिडॉरचा डीपीआर अद्यापही प्राथमिक टप्प्यात आहे. हा प्रकल्प सुरू होण्यासाठी लागणारा वेळ पाहता पुनावळे ताथवडे येथे होणारी वाहतूक कोंडी सुटणार कशी असा प्रश्‍न येथील नागरिक विचारत आहेत.

पुनावळे ताथवडे येथील लोकसंख्या गेल्या दहा वर्षांत प्रचंड वाढली आहे. मात्र, बाह्यवळण मार्गावरील भुयारी मार्गांची स्थिती मात्र ‘जैसे थे’ आहे. यामुळे या भागात होणारी वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. या भुयारी मार्ग अरुंद तसेच उंचीला कमी असल्याने येथून मोठी वाहनांची वाहतूक होणे देखील जिकरीचे झाले आहे. यासाठी या दोन्ही भुयारी मार्गांचा विस्तार व्हावा, अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत. त्यासाठी वारंवार नेते, खासदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे केलेली आहे. ‘सकाळ’नेही या भुयारी मार्गांचा प्रश्‍न वारंवार मांडला. मात्र, या भुयारी मार्गाच्या विस्तारीकरणाचा वेगळा असा प्रस्ताव नसून, त्यांचे काम किवळे ते हिंडवडी एलिवेटेड कॉरिडॉरअंतर्गत होणार आहे. मात्र, या प्रकल्पाचा डीपीआर अद्यापही प्राथमिक टप्प्यात असल्याचे नुकतेच माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये पुढे आले आहे.

रावेत, किवळे, डांगे चौक, चिंचवड, पुनावळे गाव, ताथवडे येथून मोठ्या प्रमाणावर कर्मचारी हिंजवडी येथील आयटी कंपन्यामध्ये नोकरीनिमित्त जा-ये करतात. त्यामुळे येथील भुयारी मार्ग व सेवा रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. या शिवाय मुंबईहून येणारी वाहनांमुळे मुख्य मार्गावरही वाहनांची मोठी वर्दळ असते. यामुळे कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्ग व सेवा रस्त्यांवरील सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडविण्याच्या हेतूने या मार्गावर किवळे ते हिंजवडी दरम्यान हा एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारला जाणार आहे. नऊ महिन्यांपूर्वी याची घोषणा करण्यात आली होती. यामुळे पुनावळे ताथवडे येथील वाहतूक कोंडी सुटण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, कॉरिडॉरचा डीपीआर तयार करण्याचे काम अद्यापही पूर्ण न झाल्याने त्याला मंजुरी मिळून कंत्राट प्रकियेनंतर प्रत्यक्ष काम सुरू होण्यास मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी येथील वाहतूक कोंडीतून येथील नागरिकांची सुटका होणार नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या बाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता काहीही संपर्क होऊ शकला नाही.

‘या कॉरिडॉरची घोषणा नऊ महिन्यांपूर्वी केली होती. वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होईल, पण त्याची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्याचे काम सुरू केव्हा होणार या माहितीसाठी आम्ही आरटीआय दाखल केला होता. त्यामध्ये अद्याप या कॉरिडॉरचा डीपीआर तयार नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे महापालिका व राष्ट्रीय महामार्गाने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तात्पुरती पर्यायी व्यवस्था करावी, अशी आमची मागणी आहे.
- सुमित ढगे, याचिकाकर्ता

‘पुनावळे ताथवडे भुयारी मार्गांमध्ये पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था नाही. या ठिकाणी अनेक खड्डे आहेत. या ठिकाणी पावसाळ्यात चार फुटांपर्यंत पाणी साचते. प्रवाशांसाठी ही अडचण तर आहेच. मात्र, सततच्या वाहतूक कोंडीने वाहतूक पोलिसांवरही ताण येत आहे. मात्र, अनेकदा पाठपुरावा करूनही कोणीच याची दखल घेताना दिसत नाही.
- विठ्ठल बराळ, नागरिक, पुनावळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com