संत तुकारामनगर येथे
टोळक्याकडून तरुणाला मारहाण

संत तुकारामनगर येथे टोळक्याकडून तरुणाला मारहाण

पिंपरी : रस्त्यातील दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याने सहा जणांच्या टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केली. तरुणाच्या डोक्यात दगड मारून कोयत्याने वार केल्याची घटना पिंपरीतील संत तुकारामनगर येथे घडली. आश्विनकुमार दत्तात्रेय यादव (वय २७, रा. मनाली हाउसिंग सोसायटी, नेहरूनगर, पिंपरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अविनाश लष्कर, क्षीतिज उबाळे, रोहित कांबळे, समीर मांढरे, हर्षल थोरात व त्यांचा एक साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी हे रस्त्यात दुचाकी उभी करून बोलत होते. त्यावेळी फिर्यादी हे त्यांना दुचाकी बाजूला घेऊन बोला, असे म्हणाले. यावरून आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांना बोलावून फिर्यादी व त्यांचे मित्र विश्वजित पांडे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी रोहित याने फिर्यादीच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. तर हर्षल याने फिर्यादीच्या पाठीत कोयत्याने वार करून जखमी केले.

घरातून पाऊण लाखांचा ऐवज लंपास
पिंपळे गुरव : उघड्या दरवाजावाटे घरात शिरलेल्या चोरट्याने ७४ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना पिंपळे गुरव येथे घडली. याप्रकरणी ओमप्रकाश हनुमंतराव कदम (रा. तनिषा अपार्टमेंट, क्रांतीनगर, काशीद पार्क, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. घरात शिरलेल्या आरोपीने फिर्यादी व त्यांच्या मित्राचा मोबाईल, लॅपटॉप, घड्याळ व रोकड लंपास केली.

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी : भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत सागर जालिंदर खिलारी (वय ३६) या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अतुल भोर (रा. प्राधिकरण, मोशी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अर्जुन दिलीप अवसेकर (वय ३९, रा. खराडी) या वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे मेहुणे सागर हे चालवीत असलेल्या दुचाकीस आरोपीने दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अलंकापुरम रस्त्यावर जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

टोळक्याने कोयत्याने मारहाण करीत माजवली दहशत
पिंपरी : टोळक्याने अल्पवयीन मुलाला कोयत्याने, सिमेंटच्या गट्टूने मारहाण करीत कोयते हवेत फिरवून दहशत माजवल्याची घटना थेरगाव येथे घडली. थेरगाव येथील सतरा वर्षीय मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी प्रवीण वसंत डोमनाळ (वय २०, रा. पडवळनगर, थेरगाव) याला अटक केली असून, शिवा कांबळे (वय २४), विशाल गायकवाड (वय २२), आकाश राजू आरकेरी (वय १८), एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा. पडवळनगर, थेरगाव) व इतर तीन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्याने तसेच कोयत्याने व सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर हवेत कोयते फिरवत आरडाओरडा करून दहशत निर्माण केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com