लोकसभा निवडणूकीत अनेकांना रोजगार

लोकसभा निवडणूकीत अनेकांना रोजगार

पिंपरी, ता. ११ ः उमेदवारांना मतदार किती टक्के मतदान होणार ? हे अजून निश्चित व्हायचे आहे. मात्र, ही निवडणूक अनेक बेरोजगार लोकांना रोजगार देऊन गेली. त्यानिमित्ताने निवडणूक साहित्य विक्रेते, वाहनचालकांसह इतर असंख्य हातांना काम मिळाले. काही उमेदवारांनी चक्क पगारी कार्यकर्ते नेमले.
मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा कार्यक्षेत्रांतील प्रचाराचा धडाका आता थंडावला आहे. यंदा प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्यासह ‘हायटेक’ प्रचारही करण्यात आला. सोशल मीडियावर इच्छुकांचे टाकण्यात येणारे फोटो, त्याचे डिझाईन डिझायनरकडून करून घेण्यात आले. ही यंत्रणा हाताळण्यासाठी स्वतंत्र माणसे नेमण्यात आली. विविध प्रचार माध्यमांतून कोट्यवधींची उलाढाल झाली. दुसरीकडे या निवडणूका अनेकांसाठी रोजगाराचे साधन ठरल्या.
लोकसभा निवडणुकीमुळे अडगळीत पडलेल्या विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आले आहेत. कार्यकर्ता नाराज होणार नाही, यासाठी नेते मंडळींकडून खबरदारी घेतली जात आहे. कार्यकर्त्यांच्या मदतीने किमान आपले नाव तरी सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र, पक्षाचे कार्यकर्ते यासाठी मिळणे अवघड झाल्याने अनेकांनी पगारी कार्यकर्ते नेमले. सकाळ आणि सायंकाळच्यावेळी या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन पत्रके वाटली. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार यंत्रणाही तितकीच सक्षम करण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे, उमेदवारांनी नियोजनबद्ध यंत्रणा राबविली. प्रत्येक मतदारापर्यंत कसे पोहोचता येईल ?, यानुसार नियोजन केले होते.

तीनशे ते चारशे रुपये रोजंदारी
यंदा प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्यासह ‘हायटेक’ प्रचारालाही प्राधान्य देण्यात आले. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला. ‘गुड मॉर्निंग’पासून ते विविध सुविचार, संदेश या माध्यमातून प्रचार चालू होता. ही यंत्रणा हाताळण्यासाठी स्वतंत्र माणसे नेमण्यात आली. त्यामुळे, यातून त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यासह परिचय पत्रके घरोघरी पोहोचविण्याच्या कामासाठी रोजंदारीवर माणसे नेमण्यात आली. तीनशे ते चारशे रुपये देऊन त्यांच्याकडून हे काम करवून घेण्यात आले.

चारचाकी वाहने
प्रचारासाठी चारचाकी वाहनांची आवश्यकता भासत होती. त्यामुळे, उमेदवारांनी भाडेतत्त्वावर वाहने घेतली. महिनाभर प्रचारात मोठ्या प्रमाणात वाहनांचा उपयोग करण्यात आला. वाहनमालकाला रोजचे भाडे देण्यासह चालकालाही रोजगार मिळाला.

फ्लेक्स उभारणीसाठी जादा खर्च
उमेदवारांनी प्रचारासाठी फ्लेक्स उभारणीचा धडाका लावला. हे फ्लेक्स उभारणीचे काम करणाऱ्यांना देखील रोजगार उपलब्ध झाला. यासह मतदार यादी तयार करणे, स्लिपा तयार करणे, विभागनिहाय माहिती ठेवणे या कामांसाठीही माणसे नेमण्यात आली. त्यामुळे, निवडणुकीच्या दिवसांत अनेक बेरोजगारांना रोजगार मिळत असल्याचे दिसून येत आहे. इच्छुकांकडून यंदा ‘हायटेक’ यंत्रणेचा अवलंब केल्याचे दिसून येत आहे. झेंडे, स्टिकर तयार करण्यात येत असल्याने कोट्यवधीची उलाढाल झाली.

लॅपटॉपद्वारे मतदार यादीचा तपशील
मतदार यादीचा तपशील ठेवण्यापासून ते प्रचाराचे नियोजनदेखील लॅपटॉपच्या माध्यमातून केले जात आहे. विशिष्ट माहिती मिळविणे, मतदारांचे नाव, संपर्क क्रमांक संकलित करणे आदी कामे लॅपटॉपद्वारे केली जात असून, ही यंत्रणा राबविण्यासाठी काही जणांनी संगणक अभियंत्यांचीही मदत घेतली आहे. प्रचाराची सर्व यंत्रणा हाताळता यावी, यासाठी इच्छुकांनी प्रभागात कार्यालय स्थापन केले आहे. या कार्यालयामध्येही किमान दोन ते तीन जणांची नेमणूक करण्यात आली आहे.

कामात दांडी !
भांडी-धुणी करणाऱ्या घरकामबाईला महिन्याला एका कामाचे नऊशे रुपये मिळतात. प्रचारात रोजचे जेऊन-खाऊन तीनशे रुपये मिळत असल्यामुळे कामाच्या ठिकाणी सध्या दांड्या झाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com