घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला ?

घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला ?

(चिंचवड विधानसभा मतदारसंघ)

घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला?

अश्विनी पवार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी,ता. १४ ः मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये केवळ ५२.२० टक्के मतदान झाले. २०१९ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक हे प्रमाण ५६.२९ टक्के होते. गेल्या पंचवर्षिकच्या तुलनेत हे प्रमाण चार टक्क्यांनी कमी आहे. अनेक मतदारांची नावे यादीतून गहाळ होणे, मृत मतदारांची नावे हटविली न जाणे, पोस्टल मतदानामध्ये आलेल्या त्रुटी अशा अनेक कारणांमुळे चिंचवडमध्ये मतदानाचा टक्का घसरला. मात्र, याशिवाय अनेक राजकीय गणितेही याला कारणीभूत ठरली. मात्र, या कमी झालेल्या मतदानाचा फटका कोणत्या उमेदवाराला बसणार याची चर्चा आता सुरू आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात नेहमीच भाजपचे वर्चस्व राहिलेले आहे. मावळ लोकसभेची ही जागा भाजपला मिळावी, अशी येथील भाजप पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. मात्र, ही उमेदवारी महायुतीतील शिवसेना पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांना देण्यात आली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरेही पिंपरी चिंचवडमधील स्थानिक होते. बारणे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. तर ही जागा भाजपला न मिळाल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही बारणेंच्या प्रचारामध्ये हात आखडता घेतल्याची चर्चा झाली. चिंचवड मतदारसंघातील बहुतांश भागामध्ये बारणे यांना प्रचारादरम्यान पोचता आले नाही. दुसरीकडे वाघेरे हे अनेक वर्षे राष्ट्रवादीत असल्याने तेथील जुन्या लोकांचाही पाठिंबा मिळाला.
चिंचवड मतदारसंघात सकाळपासूनच नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. मात्र, मोबाईल बंदीबाबत नागरिक अनभिज्ञ होते. जे नागरिक ओळखपत्र न बाळगता मोबाईलमधील डिजी लॉकरमधील ओळखपत्रावर अवलंबून होते. अशा मतदारांना परत घरी जावे लागले. तसेच वर्षानुवर्षे मतदान करणाऱ्यांचीही नावे मतदारयादीतून वगळण्यात आली होती. पत्ता बदललेल्या नागरिकांची नावे यादीत नव्हती. त्यामुळेही दहा टक्के मतदार मतदानापासून वंचित राहिल्याचे सांगण्यात येत होते. सकाळच्या तुलनेत दुपारी मतदान कमी झाले. खरे ओळखपत्र नसल्याने घरी गेलेले नागरिकही परत फिरकलेच नाहीत.
संजोग वाघेरे यांच्या प्रचारात अगदी शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरे यांची सभा झाल्याने वातावरण तयार झाले होते. तर बारणे यांच्या प्रचाराच्या समारोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड शो करून शक्तीप्रदर्शन केले. श्रीरंग बारणे यांनी यांनी ठाकरे यांची साथ सोडल्याने कट्टर शिवसैनिक नाराज होते. तसेच गेल्या पाच वर्षांत दिलेली आश्‍वासने पूर्ण न केल्याचा मुद्दा वाघेरे यांनी प्रचारात घेतला होता.
सर्वच विधानसभा मतदारसंघात तुलनेने कमी मतदान झाल्याने त्याचा फटका कोणाला बसणार हे चार जून रोजीच उघड होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com