उरणवासीयांचा कौल कुणाला ?

उरणवासीयांचा कौल कुणाला ?

मावळ लोकसभा मतदारसंघामधील निवडणूक ही खासदारकीची असली तरी गावागावांमध्ये आपले मताधिक्य आणि प्रतिष्ठा टिकविण्यासाठी ग्रामपंचायतीप्रमाणे नेतेमंडळींनी मतदानाचा टक्का वाढविला आहे. शहरी भागातील मतदारांचा महायुतीकडे तर ग्रामीण भागांत महाविकास आघाडीकडे कल राहिल्याने उरणवासीयांचा अंतिम कौल कुणाला मिळणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
--------------------------------
मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण ३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. मात्र, खरी लढत ही महायुतीमधील शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाविकास इंडिया आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्यामध्ये झाली आहे. यामध्ये उरण मतदारसंघाचा विचार केला; तर उरणचे चार जिल्हा परिषद मतदार संघ, पनवेलचे चार जिल्हा परिषद मतदार संघ, खालापूरचे दोन जिल्हा परिषद मतदार संघ आणि उरण नगरपालिका असा हा उरण विधानसभा मतदारसंघ बनला आहे. उरण विधानसभा मतदारसंघात तत्कालीन शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) विवेकानंद पाटील हे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर, शिवसेनेचे मनोहर भोईर हे येथून आमदार झाले आहेत. सध्या भाजपचे महेश बालदी हे विद्यमान आमदार आहेत.
हा मतदारसंघ आपल्या बाजूने राहावा, यासाठी अनेकांनी येथे कंबर कसली. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना, भाजप, शेकाप आणि काँग्रेस अशी लढत झाली होती. मात्र, शिवसेने मधून शिंदे गट वेगळा झाल्यानंतर शिंदे गट आणि खासदार बारणे यांच्याबरोबर शिवसेनेतून मोजकेच गेले आहेत. तशी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची देखील ताकद नाही. परंतु, भाजपचे आमदार असल्याने येथे भाजपची ताकद मोठी आहे.
मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे सर्व एकत्र आल्याने महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे. ग्रामीण भागामध्ये महाविकास आघाडीला प्राधान्य जास्त मिळाले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांचा कल महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्याकडे झुकलेला आहे. तर उरण शहर, रसायनीतील भाग अशा शहरी भागांत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पसंती दिसून आली. ही निवडणूक जरी खासदारकीची असली तरी गावागावांमध्ये आपले मताधिक्य आणि प्रतिष्ठा टिकविण्यासाठी ग्रामपंचायतीप्रमाणे मतदानाचा टक्का वाढविला आहे. मात्र, या मतदारसंघामधून महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांना आघाडी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, उरणवासीयांचा अंतिम कौल कोणाला मिळणार ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com