पिंपरी भोसरी विधानसभा

पिंपरी भोसरी विधानसभा

बदलत्या राजकारणाची सहानुभूती
की जातीचा फॅक्टर प्रभावी ठरणार

शिरूर मतदारसंघातील भोसरी विधानसभा क्षेत्रातील स्थिती

पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १४ : शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी विधानसभा मतदारसंघात २०१९ प्रमाणेच जातीचा फॅक्टर मतदानात दिसून आला. माळी विरुद्ध मराठा असेच मतदान झाले, तसा उघडपणे प्रचारही झाला. मात्र, त्यावेळी मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा क्षेत्रात कॉंग्रेस आघाडीला तर, केवळ भोसरीत भाजप युतीला मताधिक्य होते. तेच गणित याहीवेळी राहते की शिवसेना, राष्ट्रवादीतील फुटीचा परिणाम दिसतो? शिवाय, गेल्या पाच वर्षात वाढलेला सोसायट्यांतील मतदारांनी कोणाला साथ दिली, यावरून मताधिक्य ठरणार आहे. कदाचित शिरूरचा विजय भोसरीतील मतदानावरच अवलंबून राहू शकतो.
लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत शिरूर मतदारसंघातून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले होते. जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, हडपसर या पाच विधानसभा मतदारसंघात त्यांना आघाडी होती. केवळ भोसरी विधानसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीतील शिवाजीराव आढळराव-पाटील यांना मताधिक्य मिळाले होते. दोनवेळा खासदार राहिलेले आढळराव पाटील यांना चितपट करून डॉ. कोल्हे यांनी बाजी मारली होती. याही वेळी आढळराव विरुद्ध कोल्हे असाच सामना झाला. मात्र, शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीमुळे राजकीय समीकरणे बदललेली होती. या फुटीत मतदार कोणाला साथ देतात, हेही निर्णायक ठरणार आहे.

बदलती समीकरणे
- २०१९ च्या निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेचे उमेदवार होते. आता ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आहेत.
- शिवसेनेत फूट पडल्याने आढळराव पाटलांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली, मात्र, महायुतीच्या जागा वाटपात राजकीय तडजोड म्हणून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला व घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली
- राष्ट्रवादीतील फुटीमुळे डॉ. अमोक कोल्हे यांना घड्याळऐवजी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळालेल्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली
- २०१९ च्या निवडणुकीत विरोधात प्रचार करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी या वेळी आढळरावांचा प्रचार केला. त्यांना भाजपचे आमदार महेश लांडगे यांची साथ मिळाली
- चऱ्होली, मोशी, चिखलीत माळी व मराठा समाज जवळपास समतूल्य आहे. भोसरी, दिघी, डुडुळगावमध्ये मराठा अधिक असून शाहूनगर, नेहरूनगर, मासुळकर कॉलनी, अजमेरा, रुपीनगर, तळवडे, पूर्णानगर भागात बाहेरून आलेला मतदार आहे.
- गेल्या पाच वर्षाच मोशी, चिखली, डुडुळगाव, चऱ्होली भागात गृहनिर्माण सोसायट्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून मतदारही दुप्पट वाढले आहेत. या वाढलेल्या मतदारांचा कल निर्णायक ठरवणार आहे
- विद्यमान आमदार महेश लांडगे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे व विलास लांडे यांचे प्राबल्य आढळराव यांच्या पाठीशी होते, त्यामुळे मताधिक्य किती वाढणार? याबाबत उत्सुकता आहे
- घडाळ्याचा आता प्रचार केल्यास आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा कमळ कसे सांगायचे म्हणून काही माजी नगरसेवकांनी भोसरी परिसरात आढळरावांच्या प्रचारात आखडता हात केल्याची चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com