आकुर्डी परिसरात तब्बल दहा तास वीज गायब

आकुर्डी परिसरात तब्बल दहा तास वीज गायब

पिंपरी, ता. १४ : आकुर्डी परिसरात मंगळवारी (ता. १४) तब्‍बल दहा तास वीजपुरवठा खंडित झाला. भूमिगत केबलमधील तांत्रिक बिघाडामुळे ही समस्‍या उद्‍भवली असल्‍याचे ‘महावितरण’ने म्हटले आहे. महिन्‍याभरात ही दुसऱ्यांदा समस्‍या निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरातील व्‍यापाऱ्यांचे नुकसान होत असून स्‍थानिक नागरिकही त्रस्‍त झाले आहेत.
आकुर्डीतील म्‍हाळसाकांत चौकाजवळील भालेराव हॉस्पिटल परिसरात महावितरणच्‍या वतीने भूमिगत केबलच्‍या देखभाल-दुरूस्‍तीची कामे सुरू आहेत. ही कामे सुरू असताना सातत्‍याने काही तांत्रिक बिघाडामुळे या परिसरात वीज पुरवठा खंडित होत आहे. या महिन्‍यात दोन वेळा अशा घटना घडल्‍या. मंगळवारी (ता. १४) देखील नागरिकांना त्‍याचा त्रास सहन करावा लागला. भूमिगत केबलमधील तांत्रिक बिघाडामुळे सकाळी आठ वाजता वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता तो सुरळीत झाला. दहा तास ही समस्‍या निर्माण झाल्‍याने या परिसरातील व्‍यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सातत्‍याने या परिसरात समस्‍या निर्माण होत आहेत. याबाबत स्‍थानिक नागरिकांनी महावितरण कार्यालयाकडे तक्रारी केल्‍या.

आमच्या भागात सातत्‍याने वीज पुरवठा खंडित होत आहे. आम्‍ही वारंवार त्याबाबत तक्रारी करत आहे. मात्र, त्‍याकडे कोणीही लक्ष देत नाही. विद्युत तारांची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. जुन्‍या केबल बदलून नवीन बसवाव्‍यात. योग्य वेळेत देखभाल दुरूस्‍ती करणे गरजेचे आहे.
- सुभाष राणे, सामाजिक कार्यकर्ते

आकुर्डीत वीज पुरवठा खंडित झालेला नाही. तसेच वीज पुरवठा खंडित झाला असल्‍याबाबत आमच्‍याकडे कोणतीही तक्रार प्राप्‍त झालेली नाही.
- अशोक जाधव, अतिरिक्‍त कार्यकारी अभियंता, आकुर्डी

मागणी वाढल्याने विद्युत तारांवर जादा भार
उन्‍हाळ्यात वीजेचा अधिक वापर वाढला आहे. त्‍यामुळे विद्युत तारांवर जादा भार येत आहे. त्‍यामुळे, या अडचणी निर्माण होत असल्‍याचे ‘महावितरण’कडून सांगण्यात येत आहे. या समस्‍येवर कायमस्‍वरूपी तोडगा काढण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com