‘ई-पॉस’यंत्रावर आता ‘आय स्कॅनर’ची सुविधा

‘ई-पॉस’यंत्रावर आता ‘आय स्कॅनर’ची सुविधा

पिंपरी, ता. १५ : शिधापत्रिकाधारकांना शिधा वाटप करताना ‘ई-पॉस’ यंत्रावर हाताच्‍या बोटांचे ठसे घेण्याबरोबरच आता ‘आय स्‍कॅनर’ची (डोळ्यांचे स्‍कॅन) देखील सुविधा दिली आहे. त्‍यामुळे, हातांच्‍या बोटांचे ठसे न उमटल्‍यास डोळे स्‍कॅन करून शिधापत्रिकाधारकांना धान्‍य वाटप करणे शक्य होणार आहे. शहरातील ‘अ’ व ‘ज’ परिमंडळ कार्यालयांतर्गत १५७ स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांना ही अद्ययावत यंत्रे वितरित करण्यात आली आहेत. या सुविधेमुळे शिधापत्रिकाधारक धान्‍यापासून वंचित राहणे टळणार आहे.

शिधा धान्‍य वाटपात पारदर्शीपणा यावा, यासाठी ‘ई-पॉस’ यंत्रांची सुविधा रास्त धान्‍य दुकानदारांना पुरविण्यात आली आहे. या मशिनद्वारे एका कुटुंबात किती सदस्‍य आहेत ? त्याची माहिती मिळते आणि त्‍यानुसार, धान्‍य वाटप केले जाते. त्‍यासाठी कुटुंबप्रमुखाच्‍या हाताच्‍या बोटांचे ठसे घेतले जात होते. मात्र, अनेक वेळा हातांच्‍या बोटांचे ठसे न उमटल्‍याने धान्य शिधापत्रिकाधारकांना मिळत नाही. दुकानदारही धान्‍य देण्यास टाळाटाळ करतात. कमी धान्‍य देतात, अशा प्रकारच्या तक्रारी वाढत होत्‍या. या अडचणींमुळे दुकानदार आणि शिधापत्रिकाधारक यांच्‍यामध्ये वादावादी होत असे. त्‍यावर उपाय म्‍हणून आता अन्नधान्य वितरण कार्यालयाच्यावतीने ‘आय स्‍कॅनर’ची देखील सुविधा दिली जाणार आहे. यामध्ये हातांच्‍या बोटांचे ठसे घेण्याबरोबरच डोळ्यांचे देखील स्‍कॅन केले जाणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ‘अ’ व ‘ज’ परिमंडळ कार्यालयांचा समावेश होतो. यामध्ये ‘अ’ परिमंडळ कार्यालयांतर्गत ८२ तर ‘ज’ परिमंडळाअंतर्गत ७५ धान्‍य दुकानदारांचा समावेश होतो. या सर्वच दुकानदारांना अद्ययावत नवीन यंत्रे देण्यात आली आहेत.

धान्य वाटपालाही येणार गती
रास्‍त धान्‍य दुकानदारांना दिलेली ‘ई-पॉस’ यंत्रे फोर-जी सॉफ्टवेअरने अद्ययावत केली जाणार आहेत. पूर्वी हे यंत्र टू-जी सॉफ्टवेअरचे होते. त्‍यामुळे, धान्‍य वाटपात गती येत नव्हती. अतिरिक्‍त भाराने यंत्रे बंद पडत होती. त्‍यामुळे, शिधापत्रिकाधारकांना तास न तास धान्य वाटपाची प्रतिक्षा करावी लागत होती. मात्र, नवीन फोर-जी सॉफ्टवेअरमुळे आता धान्‍य वाटपाला गती येणार आहे.

आमच्‍याकडे असणाऱ्या ‘ई-पॉस’ यंत्रामध्ये अनेक सुविधा देण्यात येणार आहेत. ते अद्ययावत करून त्यामध्ये फोर-जीचे सॉफ्टवेअर वापरले जाणार आहे. बोटांचे ठसे न उमटलेल्‍यांना धान्य न मिळाल्‍याने तक्रारी येत होत्‍या. त्‍यावर, उपाय म्‍हणून ‘आय स्‍कॅनर’ची सुविधा देण्यात येत आहे.
- विजय गुप्‍ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेरप्राईज शॉपकिपर्स असोसिएशन

रा‍स्‍त धान्‍य दुकानदारांना फोर-जी सॉफ्टवेअरने अद्ययावत केलेली ‘ई-पॉस’ यंत्रे देण्यात आली आहेत. चार दिवसांपूर्वीच त्यांचे वाटप झाले असून या यंत्रामध्ये ‘आय स्‍कॅनर’ची देखील सुविधा दिली आहे.
- स्‍नेहल गायकवाड, पुरवठा निरीक्षक, ‘ज’ परिमंडळ कार्यालय, निगडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com