पीएमपी बसमधील आपत्कालीन साहित्य गायब

पीएमपी बसमधील आपत्कालीन साहित्य गायब

पिंपरी, ता. २ : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अनेक बसमधील लोखंडी हातोडी, दिव्यांगांच्या खुर्चीला अडकविण्यासाठी असलेले लोखंडी हुक, अग्निरोधक उपकरण आदी साहित्य ‘गायब’ झाल्याचे दिसून येत आहे. आपत्कालीन स्थितीत अशा साहित्याची गरज भासल्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे, पीएमपी प्रशासनाने या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
पीएमपीच्या बसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विविध साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. सध्याच्या अनेक बस वातानुकूलित (एसी) असून त्यांच्या खिडकीच्या ठिकाणीही काचा आहेत. प्रवासादरम्यान दरवाजेही बंद असतात. बसमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास काचा फोडून तात्काळ बाहेर पडण्यासाठी छोट्या हातोड्या उपलब्ध केलेल्या असतात. बसमध्ये ठराविक ठिकाणी त्या ठेवल्या असतात. ती हातोडी केव्हा व कशी हाताळावी ? याबाबतचा फलकही लावण्यात आला आहे. मात्र, अनेक बसमधील ही हातोडी गायब झाल्याचे दिसून येते.

अग्निशमन उपकरण नाही, दिव्यांगांनाही असुविधा
बीआरटी थांब्यांमुळे दिव्यांग व्यक्तींना व्हिलचेअरसह बसमध्ये जाणे अगदी सोपे झाले आहे. या व्हीलचेअरसाठी स्वतंत्र जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवासात संबंधित व्हिलचेअर एकाच जागी स्थिर राहावी, दिव्यांग व्यक्तीला कसलाही त्रास होऊ नये यासाठी व्हिलचेअरच्या चाकांना अडकविण्यासाठी लोखंडी हुकही उपलब्ध करून दिले जातात. मात्र, अनेक बसमधील हे हुकही गायब झालेले आहेत. त्यामुळे दिव्यांग व्यक्तीची गैरसोय होते. आगीच्या घटना घडल्यास ती शमविण्यासाठी अग्निरोधक उपकरणही बसमध्ये असते. मात्र, अनेक बसमध्ये हे उपकरण नजरेस पडत नाही.

बसची देखभाल-दुरुस्ती संदर्भात वेळोवेळी पाहणी केली जात असते. दुरुस्तीसह इतर यंत्रणेकडेही बारीक लक्ष दिले जाते. सुरक्षिततेच्यादृष्टीने अधिक काळजी घेतली जात आहे.
- सतीश गाटे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com