गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

सासऱ्याकडून जावयाला बेदम मारहाण
पिंपरी : पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या जावयाला सासऱ्याने बेदम मारहाण केल्याची घटना थेरगाव येथे घडली.
याप्रकरणी विनोद सुरेश कदम (रा. पाण्याच्या टाकीजवळ, पिंपरीगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बंडू वाघमारे (वय ५०, रा. जगतापनगर, थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांची पत्नी ही सासरी नांदण्यासाठी येत नसल्याने तिला आणण्यासाठी फिर्यादी व त्यांची बहिण तिच्या घरी गेले. त्याठिकाणी फिर्यादीचे सासरे बंडू वाघमारे यांनी फिर्यादी जावई सोबत वाद घातला. जावयाच्या बहिणीला बांबूने मारहाण केली. दरम्यान, फिर्यादी सोडवायला गेले असता सासऱ्याने त्यांच्याही डोक्यात व हातावर बांबूने मारहाण करून गंभीर जखमी केले. वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
----------------------------------------------------------
चांगला नफा मिळविण्याच्या
आमिषाने सोळा लाखांची फसवणूक
चिंचवड : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून एकाची सोळा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना चिंचवड येथे घडली. चिंचवड, तानाजीनगर येथील ४१ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, राम ठक्कर या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादी यांना व्हाट्सअप ग्रुपमध्ये ॲड केले. त्यामध्ये शेअर ट्रेडिंगविषयी माहिती देवून फिर्यादीला शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवले. फिर्यादीला लिंक पाठवून ती लिंक डाऊनलोड करण्यास सांगून त्यामध्ये शेअर खरेदी करण्यासाठी फिर्यादीच्या वेगवेगळ्या तीन बँकेच्या खात्यात एकूण २१ लाख रुपये भरण्यास भाग पाडले. त्यापैकी चार लाख ९५ हजार रुपये परत दिले. मात्र, उर्वरित १६ लाख पाच हजार रुपये परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.
-----------------------
तिकीट बुकिंगच्या
बहाण्याने फसवणूक
चिंचवड : जहाजाचे तिकीट बुक करण्याचा बहाणा करून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार चिंचवड येथील सुदर्शननगर येथे घडला. याप्रकरणी अभिजित मोहन डोळ (रा. भोईर कॉलनी, चिंचवड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिवराम मरिअप्पन व एका अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी बनावट वेबसाईटच्या मदतीने विशाखापट्टणम ते पोर्ट ब्लेअर, अंदमान असे समुद्री जहाजाचे तिकीट बुक करण्याचा बहाणा केला. त्यासाठी २९ हजार १०० देण्यास भाग पाडून फिर्यादीचा मित्र राजीव रमेश कुंमटा (वय ५९) यांची आर्थिक फसवणूक केली.
--------------------------------------------------
मोटारीची काच फोडून
चार लाखांची रोकड लंपास
पिंपरी : मोटारीची काच फोडून चार लाखांची रोकड असलेली पिशवी चोरट्याने लंपास केल्याची घटना चिंचवड येथे घडली.
याप्रकरणी रावेत येथील ३२ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीने त्यांची मोटार जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील चिंचवड येथील छत्रपती शिवाजी चौकाजवळ उभी केली होती. मोटारीत ठेवलेल्या पिशवीत तीन लाख ९५ हजारांची रोख रक्कम ठेवली होती. दरम्यान, चोरट्याने मोटारीची काच फोडून रोकड असलेली पिशवी लंपास केली.
-------------------
खोटे सांगून वृद्धेचे
दागिने पळवले
भोसरी : ज्येष्ठ नागरिकांना शासनातर्फे कपडे, रेशन व पंधरा हजार मिळत असल्याचे खोटे सांगून वृद्धेला तिचे दागिने पाकिटात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर हातचलाखीने ते पाकीट घेवून दोघेजण पसार झाल्याची घटना भोसरी येथे घडली. याप्रकरणी दिघीतील आळंदी रोडवरील सत्तर वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या आळंदी रोडवरील टिंगरे पेट्रोल पंपासमोरून जात असताना दोघेजण त्यांच्याजवळ आले. भोसरीत गरीब ज्येष्ठ नागरिकांना शासनातर्फे कपडे, रेशन व पंधरा हजार मिळत असल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीची पन्नास हजारांची सोनसाखळी, दोन हजारांची अंगठी व तीन हजाराची रोकड पाकिटात काढून ठेवायला सांगितले. त्यानंतर ते पाकीट हातचलाखीने घेऊन आरोपी पसार झाले. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

--------------
तडीपार आरोपीला
कोयत्यासह अटक
पिंपरी : पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असतानाही हद्दीत आलेल्या आरोपीला भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक कोयता जप्त केला. ही कारवाई दापोडीतील पवारवस्ती येथे करण्यात आली. ओंकार नीलकंठ गायकवाड (वय २१, रा. पंतनगर, घाटकोपर, मुंबई, मूळ- सिद्धार्थनगर, दापोडी) असे आरोपीचे नाव आहे.
--------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com