‘हिरा-राजा’, ‘गुलाब-मल्हार’ला बहुमान

‘हिरा-राजा’, ‘गुलाब-मल्हार’ला बहुमान

देहू, ता. ४ ः आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील चांदीच्या रथासाठी नांदेड येथील शेतकरी निखिल सुरेश कोरडे यांच्या ‘गुलाब-मल्हार’ आणि लोहगावमधील शेतकरी सूरज ज्ञानेश्वर खांदवे यांच्या ‘हिरा-राजा’ या बैलजोडींची निवड झाली. पालखी सोहळ्यात सेवा करण्यास मिळणार असल्याबद्दल दोन्ही शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे यावेळी उपस्थित होते.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान मिळावा यासाठी दरवर्षी संस्थानकडे अनेक इच्छुक शेतकरी अर्ज करत असतात. संस्थानकडे यंदा २६ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यानुसार, शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन संस्थानच्या विश्वस्त मंडळाने बैलजोडीची पाहणी केली. बैलाचा रुबाबदारपणा, त्यांचा रंग व इतर गुण पाहिले. त्यानुसार, संस्थानने देऊळवाड्यात मंगळवारी (ता.६) अंतिम दोन बैलजोडीची निवड केली. त्यामध्ये कोरडे आणि खांदवे यांच्या बैलजोड्यांचा समावेश होता.
नांदेडचे निखिल कोरडे हे उत्तम मृदंग आणि पखवाज वादक देखील आहेत. अनेक नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनात त्यांनी पखवाज वाजवून साथ दिलेली आहे.
कोरडे म्हणाले,‘‘गेल्या सात वर्षांपासून संस्थानकडे अर्ज करत आहे. यावर्षी बैलजोडी जुंपण्याचा मान मिळाला. घरात वारकरी संप्रदाय आहे. आम्हाला सेवा करण्याची संधी मिळावी, अशी इच्छा होती. ही संधी मिळाल्याने आनंद झाला. ‘गुलाब- मल्हार’ ही जोडी कर्नाटक बाजारातून खरेदी केली आहे. पाच वर्षांपासून या बैलजोडीचा सांभाळ करत असून त्यांची निगा राखत आहे.’’
खांदवे म्हणाले, ‘‘पालखी रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान मिळावा म्हणून आठ वर्षांपासून अर्ज करत होतो. यंदा सेवा करण्याची संधी मिळणार असल्याने आनंद होत आहे.’’
PNE24U23924

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com