कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था
कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे नियोजन

कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे नियोजन

पिंपरी, ता. ४ ः मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सोमवारी झाली. त्या परिसरात सोमवारी मध्यरात्रीपासून कडेकोट बंदोबस्त होता. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. शिवाय, त्यांच्या वाहनांसाठीही स्वतंत्र व्यवस्था केली होती. मात्र, दुपारी एकपर्यंत दोन्ही प्रवेशद्वारांवर हातावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते होते. मतमोजणीची पंधरावी फेरी सुरू झाल्यानंतर महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मतांची आघाडी घेतल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करायला सुरवात केली.
मतमोजणीसाठी नियुक्त एक हजार ५३० अधिकारी-कर्मचाऱ्यांची सोमवारी (ता. ३) सरमिसळ (रँडमायझेशन) निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर, मतमोजणी निरीक्षक मोहम्मद हारूण व निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या उपस्थितीत झाली होती. त्यानुसार मंगळवारी (ता. ४) सकाळी सहापासूनच अधिकारी-कर्मचारी मतमोजणी केंद्रावर येत होते. यात सूक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, तालिका कर्मचारी, शिपाई, हमाल, इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यांना राजवाडा द्वारातून प्रवेश देण्यात आला. मुख्य प्रवेशद्वार व राजवाडा गेट परिसरापासून दीडशे मीटर परिसरात नागरिकांना प्रवेश बंदी होती. दोन्ही ठिकाणी ध्वनिक्षेपक व्यवस्था होती. त्याद्वारे प्रत्येक फेरीनुसार उमेदवारनिहाय मतांची घोषणा व आघाडीबाबत आकडेवारी जाहीर केली जात होती. त्यावेळी कार्यकर्ते लक्षपूर्वक ऐकत होते. आपल्या समर्थक उमेदवाराने आघाडी घेतल्यानंतर आनंद व्यक्त केला जात होता.

रहदारी सुरळीत
बालेवाडीतील क्रीडा संकुल मुंबई-बंगळुरू महामार्गालगत (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) आहे. मात्र, त्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हाळुंगे रस्त्यावर आणि राजवाडा गेट महामार्गालगत आहे. या गेटलगतचा सेवा रस्ता रहदारीस बंद केलेला होता. बांबूचे बॅरिकेड्स लावून कडेकोट बंदोबस्त होता. मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्ताही बंद होता. म्हाळुंगे गावातून वाहनांसाठी पर्यायी मार्ग होता. मात्र, महाविकास आघाडी व महायुतीच्या मोजक्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त दोन्ही प्रवेशद्वारांच्या परिसरात फार गर्दी नव्हती. रहदारी सुरळीत होती. सामान्य वाहनचालकांसह राजकीय कार्यकर्त्यांसाठी दिशादर्शक फलक लावलेले होते.
------------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com